“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:54 IST2025-12-05T18:49:40+5:302025-12-05T18:54:53+5:30
CM Devendra Fadnavis News: सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांची तब्येत उत्तम आहे. या देशात त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
CM Devendra Fadnavis News: आजच्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. महाराष्ट्राच्या जनतेचे मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला. मागील एक वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रशासन एका इन्स्टिट्यूशनप्रमाणे पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विकासाची कामे आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीत कुठेही खंड पडू दिलेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यातच आज आपण सगळ्यांनी पाहिले की, आम्ही विश्वविक्रम केलेला आहे. शेतकऱ्यांची लाइफलाइन असलेल्या सौर कृषी पंपांमध्ये एका महिन्यात ४५ हजार ९११ पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देशात ९ लाख पंप लागले, त्यातील ७ लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
२०२९ लाही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील
मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल, अशा आशयाचे विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण यांना अनेकदा अशी स्वप्ने पडतात. पण मी तुम्हाला सांगतो की, हे लक्षात ठेवा की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. या देशात त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. ज्या पद्धतीने ते देशाला पुढे नेत आहेत, ते कुणीच करू शकत नाही, हे आपण सगळे जण जाणतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांची तब्येत उत्तम आहे. ४० वर्षाच्या व्यक्तिला लाजवेल, अशी कार्यक्षमता आहे. त्यामुळे २०२९ लाही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, हे लक्षात ठेवले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एका वर्षाच्या कार्यकाळाची महायुती सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस चांगला आहे. मी कुणावर काही बोलणार नाही. परंतु, मला हे माहिती आहे की, नेहमीच त्या सगळ्यांच्या मनात एक खदखद असते, ती म्हणजे हे लोक इतके करू शकले, तर आम्ही का करू शकलो नाही. यांनी इतक्या योजना आणल्या, इतकी विकास कामे केली, इतकी पायाभूत प्रकल्पांची कामे केली, परंतु, आम्हाला जेव्हा लोकांनी संधी दिली तेव्हा आम्ही हे का करू शकलो नाही, अशी भावना विरोधकांच्या मनात असतेच, ती अनेकदा बाहेर येते, त्यावर मी अधिक टीका करणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
🕞 3.23pm | 5-12-2025📍Chhatrapati Sambhajinagar.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2025
LIVE | Media Interaction#Maharashtra#ChhatrapatiSambhajinagarhttps://t.co/S867y5vEn8