“बीडला पाठवले तरी जाईन, पण ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची मन की बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:28 IST2024-12-25T14:24:23+5:302024-12-25T14:28:25+5:30

CM Devendra Fadnavis PC News: पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली.

cm devendra fadnavis said i would like to be the guardian minister of gadchiroli district if mahayuti give permission | “बीडला पाठवले तरी जाईन, पण ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची मन की बात

“बीडला पाठवले तरी जाईन, पण ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची मन की बात

CM Devendra Fadnavis PC News: मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. हा मंत्रीही नव्हता, नवखा आहे, मग कारभार कसा करणार. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचे, सातत्याने विदर्भावरील अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्रि‍पदी बसला की आपल्यावर अन्याय केला. पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की, आपण विदर्भात खूप काम केले आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊन दिला नाही. राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हान निर्माण केली जातात. गेल्या दहा वर्षात पाहिले आहे, मी अशा आव्हानांचा सामना धैर्यपूर्वक करतो आणि सत्ता कधीही माझ्या डोक्यात जात नाही. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे असेच आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे पुढे ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणापासून ते पालकमंत्रीपदापर्यंत अनेकविध विषयांवर संयमितपणे आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले. महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर अनेकांनी नाराजीचा सूर आळवला. छगन भुजबळ यांनी मोर्चेबांधणी करत, अजित पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांचेही कौतुक केले. भाजपाकडे शिल्लक असलेले मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रीय झाले असून, सरकारला इशारा दिला आहे. परभणी आणि बीड प्रकरण विरोधकांनी लावून धरले आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली. 

मला ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल

पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला पाठवले तरी मी बीडला जाईन. पण माझ्या मते साधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे कोणते पालकमंत्रीपद ठेवत नाहीत. असे असले तरी माझी इच्छा अशी आहे की, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावे. त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल. अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मन की बात बोलून दाखवली. तसेच आम्ही तिघे सोबतच काम करत आहोत. अडीच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही २०-२० चा सामना खेळलो. तो विश्वचषक आम्ही जिंकलो. पण आता कसोटीचा सामना असणार आहे. हा सामना ड्रॉ होणार नसून, हा जिंकणारा सामना असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत आणि दिलेल्या इशाऱ्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. यावर मजा काय आली पाहिजे? हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसांपासून मी असेन, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. आमच्या भूमिकेत कुठलेच अंतर नाही. आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही. जे निर्णय घेतले आहेत, तिघांनी मिळून घेतले आहेत. पुढेही जे निर्णय घेऊ, तिघे मिळून घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


 

Web Title: cm devendra fadnavis said i would like to be the guardian minister of gadchiroli district if mahayuti give permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.