“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:37 IST2025-11-16T14:34:48+5:302025-11-16T14:37:24+5:30
CM Devendra Fadnavis PC News: जिथे शक्य आहे, तिथे महायुती झालेली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
CM Devendra Fadnavis PC News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. कारण या गोष्टी स्थानिक स्तरावर होत असतात. स्थानिक स्तरावर चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी महायुती झालेली आहे. काही ठिकाणी झाली नाही. स्थानिक स्तरावर हे सगळे निर्णय होत आहेत. त्यामुळे परवापर्यंत चित्र स्पष्ट दिसेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
जागावाटपाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जागावाटप वरून होतच नाही. जागावाटप हे जिल्ह्यात होते. त्यामुळे जिल्हा स्तरावर त्या-त्या पक्षांनी एकत्र येऊन त्याबाबत ठरवलेले आहे. जिथे शक्य आहे, तिथे महायुती झालेली आहे. कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे. कुठे-कुठेच युती झालेली नाही. ही जिल्हा स्तरावरची निवडणूक आहे. ही राज्याची निवडणूक नाही. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
महापालिकेतील निकष वेगळे असतात
महापालिकेतील निकष वेगळे असतात. महापालिका ही मोठी शहरे आहेत. त्यामुळे जिथे शक्य आहे, तिथे आमची युती होणार. प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यांच्या म्हणण्याचा रोख कुणाकडे आहे, ते तुम्ही शोधून काढा. आमच्याकडे रोख नाही, हे नक्की सांगतो. अजित पवार यांची बिहार निवडणूक लढवण्याची तयारी नव्हती आणि त्यामुळे ते बिहारलाही गेले नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पुणे-संभाजीनगर रस्त्याचा नकाशा काही लोकांनी प्रसिद्ध केला आहे. ते तोंडवर पडतील. कारण तो नकाशा अंतिम झालेला नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षांपूर्वी केलेली तात्पुरते संरेखन आहे. आता संरेखन हे एमएसआयडीसी करत आहे. एकदा संरेखन अंतिम झाले की, ते सार्वजनिक कागदपत्र होणार आहे. त्यामुळे त्यात काही लपवाछपवी असणार नाही. अंतिम आराखडा समोर येईल, तेव्हा सगळे स्पष्ट होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.