अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:50 IST2025-11-23T16:45:21+5:302025-11-23T16:50:30+5:30
CM Devendra Fadnavis PC News: निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
CM Devendra Fadnavis PC News: माळेगाव नगरपंचायतीत आमच्या विचारांचे १८ उमेदवार निवडून द्या. मी सांगितलेले सगळे करीन; पण, तुम्ही जर 'काट' मारली, तर मीही 'काट' मारणार. तुमच्या हातात मताचा अधिकार आहे, तर माझ्या हातात निधीचा अधिकार आहे, आता बघा काय करायचं ते, असा थेट आणि सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मी एवढेच सांगतो की, संपूर्ण राज्याचा विकास आम्हाला करायचा आहे. सर्व भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. अनेकवेळा भाषणात काही गोष्टी आपण बोलतो. त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. आमचे सहकारी किंवा कोणी असे बोलले असले, तरी त्यांचा उद्देश तसा नाही. तेही असा भेदभाव कधी करणार नाहीत. निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला जनता निवडून देईल. त्यानंतर महाराष्ट्राचा, नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
न बोलण्यासारखे काही घडलेले नाही
एकनाथ शिंदे यांच्याशी निर्माण झालेल्या दुराव्याच्या दाव्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, हा वेड्यांचा बाजार सुरू आहे. यामध्ये काही माध्यमे वेडी झाली आहेत. परवा जेव्हा मी आणि एकनाथ शिंदे हुतात्मा स्मारकावर गेलो, तेव्हा आल्यावर आणि जाताना आम्ही भेटलो. ते कुठे जात आहेत, हे त्यांनी सांगितले आणि मी कुठे जात आहे, हे त्यांना सांगितले. त्यातून काही गोष्टी क्लिक करून बोललो नाही, असे दाखवले गेले. कालच्याही कार्यक्रमात आमच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याचे ठरले होते. तिथे आल्यावर, स्टेजवर आणि जातानाही आम्ही भेटलो. कारण न बोलण्यासारखे काहीही घडलेले नाही. तुम्ही दाखवत आहात, तशी कुठलीही परिस्थिती नाही. जे लोक असे दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, मी काय साधू-संत नाही. तुम्ही मतदान करा, कामे मी करून देईन. मागचे गेले ते गंगेत गेले. ही नवी पहाट आहे. माझ्याकडे १४०० कोटींचे बजेट आहे. त्यातला तुमचा हिस्सा मी नक्की आणून देईन. देश-राज्यात युती असताना माळेगावमध्ये झालेली स्थानिक युती ही विकासासाठीच आहे. आमच्या युतीत कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. बारामतीत हजारो कोटींचा निधी आणला, तसेच येथेही करणार. अर्थखाते माझ्याकडे आहे. वाढपी तुमच्यासमोर आहे. ओळखीचा वाढपी अधिक वाढतोच, असे अजित पवार म्हणाले.