नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:40 IST2025-09-25T08:38:13+5:302025-09-25T08:40:35+5:30

महापुराने होत्याचं नव्हतं केलं, गुरं गेली, पिकं खरडली, घरंही बुडाली, काय खावं? कसं जगावं? हा एकच सवाल! मराठवाड्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती, अनेक गावांना वेढा, प्रकल्पांमधून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

CM Devendra Fadnavis and DCM Ajit Pawar, Eknath Shinde along with the Guardian Minister inspected the damaged areas in various districts of Marathwada Flood | नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढण्याऱ्या पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी बुधवारी विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी अनेकांनी चिखल झालेली पिके दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजुनही अनेक गावांना पुराचा वेढा असून पिकांसह घरांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे. 

लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी दुपारी काही भागात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. सावरगाव माळ येथे वीज पडून तीन गायी दगावल्या आहेत. परभणी जिल्ह्याच्या वरच्या भागातील धरणांतून वाढलेल्या विसर्गामुळे गंगाखेड शहरातील बरकतनगर व इतर भागात पुराचे पाणी घुसले आहे. जिल्ह्यात भारतीय सेना दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने १२३८ जणांना स्थलांतरित केले आहे. अशांना शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात आश्रय दिला आहे. दुष्काळी तालुका असलेल्या जत (सांगली) तालुक्यात २००९ साली अतिवृष्टी झाली होती. सध्या या आठवणी गावात ताज्या झाल्या आहेत.

मुख्यमंत्री बांधावर : साहेब, माझ्या २० एकर शेतीचे नदीपात्र झाले हो !

शेतकरी शिवपुत्र आग्रे यांचा आवाज थरथरत होता. त्यांच्या डोळ्यांत पुराच्या पाण्यात बुडालेल्या २० एकर शेतीचे दुःख स्पष्ट दिसत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर असताना, शिवपुत्र आग्रे यांनी हात जोडले आणि म्हणाले, साहेब, तुम्हीच आमचे मायबाप... या संकटातून आमची सुटका करा! त्यांच्या या एका वाक्यात येथील शेकडो शेतकऱ्यांचे हृदय तुटण्याचे दुःख व्यक्त झाले. लातूर येथे पाहणीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगत तत्काळ मदत आणि नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. तसेच, भविष्यात पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांचे वचनही दिले.

मायबाप तुम्हीच, तात्पुरती मदत नको; आमचे पुनर्वसन करा

पावसाने जिल्हाभरात शेती, घर, पशुधनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराने होत्याचे नव्हते केले. या परिस्थितीची बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी पाणावलेल्या डोळ्याने तात्पुरत्या मदतीची नव्हे तर पुनर्वसनाची अपेक्षा असल्याचे काकुळतीला येऊन सांगत होते. मंत्र्यांनी अनेक गावात पाहणी केली. बोटीने शेतातील पिकांचा अंदाज घेतला. यानंतर शेतकरी व महिलांशी संवाद साधला. शेती खरडून गेली, घरात पाणी शिरले, जनावरे वाहून गेली, यामुळे भरीव मदत करावी. मायबाप तुम्हीच आहात, पुनर्वसन करा, अशा शब्दांत महिलांनी भावना व्यक्त केल्या.

पुराने हाल हाल करू सोडले, हात जोडून महिलांनी प्रश्न मांडले

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे. त्यामुळे ड्रोनचा वापर करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी बुधवारी सकाळी  कोर्टी येथील बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर संगोबा येथे सीना नदीला आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत देताना ६५ मिलिमीटरची अट ठेवणार नाही. अधिकाऱ्यांनाही फार नियमावर बोट ठेवू नका, असेही सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले.

English summary :
Marathwada and surrounding districts face severe flood damage. Leaders surveyed affected areas, offering assurances of immediate aid and long-term solutions. Farmers pleaded for resettlement and substantial assistance after losing crops, homes, and livestock. Drone surveys are ordered for accurate damage assessment.

Web Title: CM Devendra Fadnavis and DCM Ajit Pawar, Eknath Shinde along with the Guardian Minister inspected the damaged areas in various districts of Marathwada Flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.