शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:20 IST2025-11-20T10:19:54+5:302025-11-20T10:20:39+5:30
संवाद साधणे म्हणजे नाराजी होत नाही. ही चर्चा आमच्या कुटुंबातील आहे. मात्र त्याचा आसुरी आनंद विरोधकांना कसा असू शकतो हे काल पाहायला मिळाले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.

शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
रत्नागिरी - मागील २ दिवसांपासून महायुतीत शिंदेसेनेचे नाराजीनाट्य समोर आले आहे. राज्याच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकणे, त्यानंतर शिंदेंनी अचानक दिल्ली दौरा करत केंद्रीय गृह मंत्री अमित शाहांची भेट घेणे यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल आहे असं चित्र नाही. त्यात शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार अमित शाहांकडे केल्याचे दिसून येते. महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात प्रामुख्याने एकमेकांच्या नेत्यांना पक्षात घेण्यावरून वाद सुरू झालेत. त्यात कल्याण डोंबिवलीतील पक्षांतरामुळे शिंदे नाराज झाले. आता अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिंदेसेनेच्या नेत्यांना महत्त्वाचा आदेश दिल्याचं समोर आले आहे.
महायुतीतील वादावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, महायुतीत नाराजी नाही, आमच्यात संवाद होत असतो. यापुढच्या काळात शिवसेनेचा धनुष्यबाणाचा जो पदाधिकारी असेल त्याला भाजपात घ्यायचे नाही आणि भाजपाचा पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही असे स्पष्ट आदेश आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ही कार्यवाही आमच्या पक्षात सुरू झाली आहे. कालच आम्हाला एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, जिल्हाप्रमुख आणि उपनेत्यांना या गोष्टी कळवा, तसा एकनाथ शिंदे यांचा आदेश आम्ही शेवटच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ३ वर्षापूर्वीचा प्रसंग न विसरल्यामुळे आमच्यावर टीका टिप्पणी होत असते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जे बॉन्डिंग आहे ते राजकारणाच्या पलीकडचे आहे. त्यामुळे जे कुणी ट्विट करतायेत, मुलाखती देतायेत, त्यांच्या मनातील मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही. संवाद साधणे म्हणजे नाराजी होत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. आमच्यात नाराजी असेल तर ती आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार, शासनाचे राज्यप्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार, ही चर्चा आमच्या कुटुंबातील आहे. मात्र त्याचा आसुरी आनंद विरोधकांना कसा असू शकतो हे काल पाहायला मिळाले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान, अंबादास दानवे हे माझे जवळचे मित्र आहेत, कदाचित त्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवली असेल. भविष्यात त्यांना त्यांचा बॉस बदलायचा असेल म्हणून बॉसचा उल्लेख त्यांनी केला. आता ते बॉस एकनाथ शिंदे यांना म्हणतील की देवेंद्र फडणवीस यांना ते माहिती नाही. त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यांना तिथे व्यवस्थित राजकारण करायला देतील असं वाटत नाही असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी दानवे यांच्या दाव्यावर पलटवार केला आहे. शिंदेसेनेतील काही नेत्यांनी आता देवेंद्र फडणवीसांना बॉस मानले आहे असा दावा अंबादास दानवे यांनी केला होता.