भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:11 IST2025-10-07T15:10:13+5:302025-10-07T15:11:05+5:30
CJI Bhushan Gavai News: आपण जगा आणि इतरांनाही जगू द्या, असा संविधानाचा केंद्रबिंदू आहे, असे सांगत भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी एक कळकळीची विनंती केली आहे.

भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
CJI Bhushan Gavai News: कायदा हातात घेऊन अराजकता माजवण्याचा कोणालाही या देशात अधिकार नाही. कृपया आपण आपले प्रश्न संविधानिक मार्गाने सोडवून घ्यावेत, अशी मी सर्वांना विनंती करते. सर्वांचे मंगल होवो, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी दिली. खटल्याचे कामकाज सुरू असतानाच एका वकिलाने भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सरन्यायाधीशांना कोणतीही इजा झाली नाही.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेकांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसकडून या हल्ल्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. या घटनेतील हल्लेखोर वकिलाचे नाव राकेश किशोर असे आहे. या प्रकाराबाबत खंत नसल्याची प्रतिक्रिया राकेश किशोर यांनी दिली आहे.
आपण जगा आणि इतरांनाही जगू द्या, असा या घटनेचा केंद्रबिंदू आहे
घटनाकारांनी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सर्वसमावेशक अशी घटना म्हणजेच संविधान प्रदान केले आहे. लोक किंवा व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देशाला सुपूर्द केली आहे. आपण जगा आणि इतरांनाही जगू द्या, असा या घटनेचा केंद्रबिंदू आहे, असेही कमलताई गवई यांनी नमूद केले.
सर्वांनी त्याचा निषेध केलाच पाहिजे
कालची सर्वोच्च न्यायालयात घडलेली घटना केवळ संविधान नाही, तर आपल्या देशाला काळिमा फासणारी आहे. ही गोष्ट निंदनीय असल्याचे सर्वांनीच म्हटले आहे. पण हा हल्ला वैयक्तिक नव्हता, तर ती एक विषारी विचारधारा आहे. या विषारी विचारधारेला आपण थांबवलेच पाहिजे. संविधानाच्या विरोधात कोणी वागत असेल, तर त्याविरोधात आपण कारवाई केली पाहिजे. सर्वांनी त्याचा निषेध केलाच पाहिजे, असे भूषण गवई यांच्या भगिनी कीर्ती अर्जुन यांनी म्हटले आहे.
...तर पुढील पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही
भूषणदादांशी आमचे बोलणे झाले. त्यांनी जसे काल सांगितले की, दुर्लक्ष करा. हा त्यांचा मोठेपणा आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर आपण याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अशा प्रकारचे गैरकृत्य आपण थांबवले नाही, तर पुढील पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही. आईने सांगितल्याप्रमाणे संविधानिक मार्गानेच याचा निषेध व्हायला हवा. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य या कशालाही काळिमा लागता कामा नये, असे आवाहन कीर्ती अर्जुन यांनी केले आहे.
दरम्यान, बूटफेकीच्या प्रकारानंतर सरन्यायाधीश हे अविचल होते. त्यांनी कामकाजही थांबवले नाही. अशा घटनेने कोणीही विचलित होऊ नये, आम्हीही झालेलो नाही. अशा घटनांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली.