‘सीआयएसएफ’चे सुरक्षारक्षकांना सक्षमतेचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 08:45 IST2025-09-06T08:43:42+5:302025-09-06T08:45:11+5:30
भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने बंदरांवर तैनात खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला.

‘सीआयएसएफ’चे सुरक्षारक्षकांना सक्षमतेचे धडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग: भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने बंदरांवर तैनात खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, मुंबई आणि चेन्नई पोर्ट अथॉरिटी येथे एकाच वेळी हा उपक्रम सुरू झाला. दोन आठवड्यांचा सुरक्षा अभ्यासक्रमातून बंदर कार्यपद्धती, धोके ओळखणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यासंबंधी आवश्यक ज्ञान दिले जाणार आहे.
यामुळे घेतला निर्णय
भारतामध्ये सुमारे २०० लहान आणि मध्यम बंदरे आहेत. त्यातील सुमारे ६५-६८ बंदरे सक्रियपणे मालवाहतुकीच्या कार्यात गुंतलेली आहेत. सीआयएसएफ सर्व १३ प्रमुख बंदरांची सुरक्षा पुरविते, तर खासगी सुरक्षा एजन्सी लहान बंदरांवर मालवाहतूक क्षेत्र, गोदामे, प्रवेशद्वारे आणि इतर सुविधांची सुरक्षा सांभाळतात. बंदर प्राधिकरण, सीमा शुल्क विभाग, शिपिंग कंपन्या, मालवाहतूक एजंट्स, आदी संबंधित घटकांशी सल्लामसलत करून हा प्रशिक्षण कार्यक्रम पायलट प्रकल्पाच्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय
घेतला आहे.
४० कर्मचाऱ्यांची नोंद
जेएनपीए शेवा, डीपीए कांडला आणि एमपीए मुंबई या तीन प्रमुख बंदरांतील ४० खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जेएनपीए प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथे नोंदणी केली आहे. तसेच न्यू मंगळुरू पोर्ट अथॉरिटी, कामराजर पोर्ट लिमिटेड एन्नोर, चेन्नई पोर्ट अथॉरिटी आणि वी. ओ. चिदंबरनार पोर्ट अथॉरिटीच्या २६ जणांची नोंद झाली आहे.
भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलला बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे सुनिश्चित होईल.
पी. एस. रणपिसे, अतिरिक्त महासंचालक (दक्षिण)
बंदरांच्या गुंतागुंतीच्या वातावरणानुसार केंद्रित प्रशिक्षण देऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांना आत्मविश्वास आणि व्यावसायिकतेसह त्यांच्या कर्तव्यांचे पालन करण्यासाठी सक्षम करीत आहोत. व्यापाराची सुरक्षा सुनिश्चित होत आहे.
सरवनन, महानिरीक्षक (सीआयएसए) दक्षिण विभाग मुख्यालय