‘चित्रभूषण’ रामनाथ जठारांच्या पत्नीची उतारवयात आबाळ ! मानधनासाठी धडपड : अवघ्या तीन फुटांच्या जागेत संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:00 AM2018-12-20T01:00:59+5:302018-12-20T01:03:12+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संकलक व ध्वनिमुद्रक रामनाथ जठार यांच्या इंदिरा या ८८ वर्षांच्या वयोवृद्ध पत्नी विपन्नावस्थेत जीवन कंठत आहेत. तीन फुटांच्या अरुंद, चिंचोळ्या जागेत आपल्या आयुष्याला ठिगळांची जोड देत, दोनवेळच्या जेवणापासून ते अगदी लहानसहान गरजा पूर्ण करण्याइतकीही त्यांची परिस्थिती

'Chitrabhushan' Ramnath Jathar's wife is in the old age! Struggling to honor: World in just three feet of space | ‘चित्रभूषण’ रामनाथ जठारांच्या पत्नीची उतारवयात आबाळ ! मानधनासाठी धडपड : अवघ्या तीन फुटांच्या जागेत संसार

ज्येष्ठ ध्वनिमुद्रक रामनाथ जठार यांच्या पत्नी इंदिरा या डांगे गल्लीत अशा हलाखीच्या अवस्थेत जीवन कंठत आहेत.

Next
ठळक मुद्देआपल्या अखेरच्या दिवसांत सुरू असलेली जगण्याची लढाई थोडी सुकर व्हावी, यासाठी झटताहेत.

इंदुमती गणेश ।

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संकलक व ध्वनिमुद्रक रामनाथ जठार यांच्या इंदिरा या ८८ वर्षांच्या वयोवृद्ध पत्नी विपन्नावस्थेत जीवन कंठत आहेत. तीन फुटांच्या अरुंद, चिंचोळ्या जागेत आपल्या आयुष्याला ठिगळांची जोड देत, दोनवेळच्या जेवणापासून ते अगदी लहानसहान गरजा पूर्ण करण्याइतकीही त्यांची परिस्थिती नाही. झगमगत्या सिनेसृष्टीच्या पडद्यामागचा अंधार, त्यांच्यानंतर कुटुंबीयांच्या अवस्थेचे भयाण वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे.

रामनाथ जठार यांनी १९४१ ला ‘हंस पिक्चर्स’मध्ये लाईटबॉय म्हणून कामाला सुरुवात केली आणि १९४६ साली भालजी पेंढारकर यांच्या ‘प्रभाकर पिक्चर्स’मध्ये प्रवेश केला. सलग ४० वर्षे त्यांनी भालजींशी एकनिष्ठ राहून चित्रपटांचे ध्वनिमुद्रण केले, ते ध्वनिलेखक झाले. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानेही २००८ साली त्यांना ‘चित्रभूषण’ पुरस्कार प्रदान केला होता. अशा या मोठ्या कलावंताचे वयाच्या ९८ व्या वर्षी फेब्रुवारी २०१६ मध्ये निधन झाले. रामनाथ जठार हे जुना बुधवार पेठेतील डांगे गल्लीत राहत होते. त्यांना वृद्ध कलाकार म्हणून १५०० रुपये मानधन मिळत होते. त्यांच्या निधनानंतर वयोवृद्ध इंंदिरा यांचे हाल सुरू झाले.

कशाबशा तीन फुटांच्या जागेत त्या स्वत:चे जेवण करून खातात. स्वत:ची सगळी कामं करतात. वृद्ध कलाकाराचे वारसदार म्हणून इंदिरा यांचे नाव लागले नाही; त्यामुळे मुलीने प्रयत्न करून शासनाकडे सगळा प्रस्ताव पाठवला; त्याला मंजुरीही मिळाली, तरी हातात रक्कम पडेना. गेल्या दीड वर्षात जिल्हा परिषदेने या प्रकरणात टोलवाटोलवी केली.
अखेर काही दिवसांपूर्वी शासनाकडून वारसदार म्हणून नाव लागल्याचे पत्र मिळाले; पण रक्कम खात्यावर आलीच नाही. त्यावर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी खाते क्रमांक चुकीचा पडला आहे, असे कारण पुढे केले. पतीनंतर या मानधनासाठी अजूनही वृद्ध इंदिरा यांची धडपड सुरू आहे. आपल्या अखेरच्या दिवसांत सुरू असलेली जगण्याची लढाई थोडी सुकर व्हावी, यासाठी झटताहेत.


चित्रपटांचा ठेवा अडगळीत
रामनाथ जठार यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास ७० ते ८० चित्रपट केले. त्या सर्व चित्रपटांचा इतिहास त्यांनी कृष्णधवल छायाचित्रे, पुरस्कार, सन्मानपत्रांच्यारूपाने जपला होता. त्यांच्या निधनानंतर मात्र स्वत:च्याच जगण्याची हेळसांड सहन करीत असलेल्या इंदिरा यांना हा अमूल्य ठेवा जपणे शक्य झालेले नाही. त्यामुळे हा ठेवा आता अडगळीत पडला आहे, तर काही नष्टच झाला आहे. या आजींना मानधन देण्यासाठी व चित्रपटांचा इतिहास जतन करण्यासाठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यशवंत भालकर यांचे अखेरचे प्रयत्न
शासनदरबारी दादच लागत नसल्याचे बघून इंदिरा आज्जींनी पंधरा दिवसांपूर्वी दिग्दर्शक यशवंत भालकर यांची भेट घेऊन आपली परिस्थिती सांगितली. त्यांना भालकर यांनी ‘तुमचं काम करून देणारच,’ असा शब्द दिला. महापौर सरिता मोरे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी इंदिरा आजींची परिस्थिती पाहिली आणि मंगळवारी सायंकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांना लेखी निवेदन देऊन त्यांना अर्थसाहाय्य मिळावे, अशी विनंती केली. आमदारांनीही सकारात्मक निर्णय घेऊ, असा प्रतिसाद दिला; पण बुधवारी बातमी आली ती भालकर यांच्याच निधनाची. क्षीरसागर यांनी या आठवणींना स्मशानभूमीत उजाळा दिला.


 

Web Title: 'Chitrabhushan' Ramnath Jathar's wife is in the old age! Struggling to honor: World in just three feet of space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.