मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन

By यदू जोशी | Updated: June 1, 2025 07:13 IST2025-06-01T07:12:31+5:302025-06-01T07:13:35+5:30

चुका केलेल्यांना दिली जात आहे समज

Chief Minister's Office 'watches' ministers' PS, OSDs; Work will be evaluated | मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन

मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे पीएस, ओएसडी नेमण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने केले. एवढ्यावरच न थांबता आता या पीएस, ओएसडींच्या कामगिरीवर वॉच ठेवला जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. कोणी काही चूक केली तर त्याला बोलावून समजही दिली जात आहे, असे समजते.

आतापर्यंत ३५ पीएस आणि ९० ओएसडी नेमण्यात आले आहेत. सात मंत्र्यांकडील ओएसडी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मंत्र्यांना विशिष्ट व्यक्तीच पीएस, ओएसडी म्हणून हव्या होत्या; तशी नावे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविली. मात्र ती जशीच्या तशी मंजूर झाली नाहीत. जी नावे पाठविली गेली, त्यांची विश्वासार्हता तपासली जात आहे. आधी हे अधिकारी कोणत्या कार्यालयात काम करायचे, तिथे त्यांचा ‘रेकॉर्ड’ कसा होता, याचा बारीकसारीक तपशील घेतला जात आहे. गडबड करणारे चेहरे बदलण्यास सांगितले जाईल, असे धोरण मुख्यमंत्री कार्यालयाने स्वीकारले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बसले होते अडून तरी...

  • भाजपचे एक दिग्गज मंत्री आपल्याला आधीचाच पीएस हवा म्हणून अडून बसले होते;  पण मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना स्पष्टपणे नकार दिला. शेवटी त्यांना नवीन पीएस नेमावा लागला.
  • दहा पीएस असे होते की, ज्यांना मुंबईत क्वार्टर नव्हते. त्यामुळे त्यांची फारच गैरसोय होती आणि कामावरही त्याचा परिणाम होत होता. आता मुख्यमंत्री कार्यालयाने पुढाकार घेऊन त्यांना मंत्रालयाजवळ क्वार्टर मिळवून दिले आहेत. 
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संघटनांची कामे प्राधान्याने व्हावीत यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडे एकेक पीए नेमण्यात आला आहे.


कान पिळून करून दिली जाणीव

नियुक्ती झालेल्यांपैकी एक पीएस आणि एक ओएसडी यांना मुख्यमंत्री कार्यालयात बोलावून चांगलीच समज देण्यात आल्याची माहिती आहे. ‘चांगले काम करा, काही गडबड करणार असाल तर तुमच्यावर वॉच आहेच,’ याची जाणीव करून देत संबंधितांना त्यांचे कान पिळल्याचे समजते.

दरम्यान, ३५ पीएस, ९० ओएसडी नेमताना त्यांच्या चारित्र्याची सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने विविध प्रकारे घेतली होती. तरीही पाच-सहा जणांच्या वर्तणुकीबद्दल अद्याप संशयाची पाल चुकचुकत  असल्याने त्यांची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व पीएस, ओएसडी यांचे प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात आले होते, तेव्हाच त्यांना ‘तुमच्याबद्दल कोणतीही गैरव्यवहाराची तक्रार येता कामा नये,’ असे बजावण्यात आले होते. 

Web Title: Chief Minister's Office 'watches' ministers' PS, OSDs; Work will be evaluated