मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अभय ?

By Admin | Updated: June 21, 2014 19:22 IST2014-06-21T19:22:30+5:302014-06-21T19:22:30+5:30

राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होण्याची चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्ष नेतृत्वाने अभय दिल्याचे वृत्त आहे.

Chief Minister Prithviraj Chavan Abhay? | मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अभय ?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अभय ?

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २१- राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होण्याची चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्ष श्रेष्ठींनी अभय दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असे दिसते. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करावे अशी मागणी जोर धरत होती. काँग्रेसमधील काही आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्यासाठी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींवर दबाव आणला होता. काँग्रेस नेतृत्वानेही गुलाम नबी आझाद आणि ए.के. अँटोनी यांची राज्याच्या निरीक्षकपदी नेमणूकही केली आहे. हे दोघे राज्यातील काँग्रेस पदाधिका-यांचे मत जाणून घेतील असे वृत्त होते. 
यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिल्लीत पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी आणि अहमद पटेल,  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्ष नेतृत्वाने तूर्तास मुख्यमंत्र्यांना अभय दिले असून त्यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्यात येईल असे समजते. २८ जून रोजी चव्हाण ए.के. अँटोनी यांच्या समितीसमोर त्यांची भूमिका मांडणार आहेत. चव्हाण यांच्यासाठी आणखी दिलासादायक बाब म्हणजे पक्ष नेतृत्वाने राज्यात निरीक्षक पाठवण्याचा निर्णयही मागे घेतल्याचे समजते. 

Web Title: Chief Minister Prithviraj Chavan Abhay?