वंचितला मुख्यमंत्रीच देताहेत बळ : पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 18:47 IST2019-08-31T18:39:19+5:302019-08-31T18:47:08+5:30
मुख्यमंत्र्यांना राजकीय भविष्य सांगून ज्योतिषाचा छंदा करायचा असेल तर त्यांनी तो करावा...

वंचितला मुख्यमंत्रीच देताहेत बळ : पृथ्वीराज चव्हाण
पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपाचा संबंध कसा आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांकडूनच वंचितला राज्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केला. तसेच वंचित किंवा मनसेला आघाडीत घेण्याबाबतच्या मुद्यालाही त्यांनी बगल दिली. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे वंचित सोबतच्या आघाडीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे वंचित विकास आघाडीशी आपली खरी लढत असून विधीमंडळातही वंचितच विरोधी पक्ष असेल असे वक्तव्य केले आहे. याविषयी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना राजकीय भविष्य सांगून ज्योतिषाचा छंदा करायचा असेल तर त्यांनी तो करावा. तसेच वंचितला वाढविण्याचे प्रयत्नही करावेत. ईडी आणि सीबीआयची भिती दाखवून पक्षांतर करून घेतले जात आहे. विरोधी पक्ष संपवून टाकण्याचे कारस्थान भाजपा आणि आरएसएस करत आहे. लोकशाहीत एकच पक्ष म्हणजे हुकूमशाही असते. तेच त्यांना हवे आहे. अमित शहा यांनी साम, दाम, दंड, भेद ही रणनीती मुख्यमंत्र्यांनी अवलंबिली आहे. पक्षांतर केलेल्या प्रत्येक अडचणीत आहे. त्यांच्या काय अडचणी आहेत, याची माहिती माज्याकडे आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अद्याप पुर्ण झालेली नाही. आघाडी झाल्यानंतर कोणत्या मित्रपक्षाला किती जागा सोडायच्या हे तो पक्ष ठरवेल, असे चव्हाण यांनी सांगितले. मनसेला आघाडीत घेण्याच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. तसेच वंचितशी आघाडीबाबतही त्यांनी भाष्य केले नाही.
-----------
बेरोजगारी, भ्रष्टाचार प्रमुख मुद्दे
आगामी विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकºयांचे प्रश्न हे प्रमुख मुद्दे घेऊन सामोरे जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. अद्याप आघाडी झाली नसली तरी सरकारची धोरणे व अपयशाविरोधात आम्ही पदार्फाश यात्रेच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहचत आहोत. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकत्रित झालेल्या राज्यांमध्ये चित्र वेगळे दिसले. त्यामुळे मतदार दोन्ही निवडणुकांसाठी वेगळा विचार करतात. महाराष्ट्रतही राज्यातील मुद्यांवरच निवडणुका होतील, असे चव्हाण यांनी नमुद केले.
--------