‘पाताल लोक’ तयार करून भुयारी मार्गांचे जाळे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:16 IST2025-11-25T09:13:29+5:302025-11-25T09:16:38+5:30
Devendra Fadnavis: मुंबईत पाताल लोक तयार करून भुयारी मार्गांचे जाळे तयार केले जाईल. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते व भुयारी मार्ग तयार केल्याने मुंबई कोंडीमुक्त होईल. मुंबईच्या पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जोडणीला वेग देणार महत्त्वाचे प्रकल्प आगामी पाच वर्षांत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘पाताल लोक’ तयार करून भुयारी मार्गांचे जाळे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
मुंबई : मुंबईत पाताल लोक तयार करून भुयारी मार्गांचे जाळे तयार केले जाईल. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते व भुयारी मार्ग तयार केल्याने मुंबई कोंडीमुक्त होईल. मुंबईच्या पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जोडणीला वेग देणार महत्त्वाचे प्रकल्प आगामी पाच वर्षांत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वरळी डोम येथे इंडियाज् इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाईट नेशन्स (आयआयएमयूएन) आयोजित यूथ कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सध्या मुंबईचा सरासरी वेग २० किमी प्रति तास इतका आहे. सकाळी व संध्याकाळी हाच वेग १५ किमी प्रति तास इतका असतो. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून ६० टक्के मुंबई धावते. त्याचा भार कमी होईपर्यंत मुंबईला वाहतूक कोंडीतून कुणीच बाहेर काढू शकणार नाही. त्यामुळे प्रति तास ८० किमी वेगाने वाहने चालविणारे रस्ते बांधत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
२५ वर्षांवरील तरुणांना निवडणुकांमध्ये संधी
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही जास्तीत जास्त तरुणांना संधी देणार आहोत. आमचा पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी ४० टक्के जागा या ३५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांना देणार आहोत. त्यासोबतच महिलांनाही संधी दिली जाणार आहे.
- देवेंद्र फडणवीस: मुख्यमंत्री
नियम करून सीवेज ट्रिटमेंट प्लांट्स होतोय
पालकांमध्ये खासगी शाळांचे आकर्षण वाढल्याने शासकीय व महानगरपालिका शाळांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आता बदलत आहे. आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत महानगरपालिकांच्या शाळांना नेण्याचा संकल्प असून, मुंबई पालिकेकडे ती क्षमता आहे.
शासकीय शाळांना योग्य प्रशिक्षण, अध्यापन पद्धती, पायाभूत सुविधा दिल्यास त्या खासगी शाळांपेक्षा सरस ठरतील. मुंबईचा १०० टक्के सीवेज समुद्रात टाकणे योग्य नसून आता नियम करून मुंबईत सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स उभारत आहोत.
धारावी पुनर्विकासात ३० टक्के क्षेत्र पूर्णपणे अनडेव्हलपेबल ठेवले जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात मिळालेल्या मोकळ्या जागेत सार्वजनिक हिरवे क्षेत्र तयार होईल, असे ते म्हणाले.