"एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही"; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:04 IST2025-03-07T13:32:05+5:302025-03-07T14:04:32+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाच्या स्थगितीवर बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

"एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही"; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले
CM Devendra Fadnavis on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. तसेच एकनाथ शिंदेंनी केलेल्या नियुक्त्या फडणवीस सरकारने रद्द केल्या होत्या. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार हे तिघांच्या समन्वयाने चालणारे सरकार असल्याचे म्हटलं आहे. स्थगिती संदर्भात राजकीय वर्तुळात असलेल्या चर्चांवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना आणि नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे म्हटलं जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवल्याचे समोर आलं. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"गेल्या काही काळापासून माध्यमांमध्ये फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली ही बातमी आवडती झाली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. जे जे राज्याच्या हिताचे आहे ते सुरु करत असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी आणि अजित पवार होतो. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत त्यांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदेंची नाही आमच्या तिघांची आहे. प्रशासनात खालच्या स्तरावर गडबड होते. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी फडणवीसांचा दणका असं म्हटलं जात. एखाद्या खात्याच्या मंत्र्यांने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्थगिती दिली तरी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या खात्याला स्थगिती दिली असं म्हटलं जातं. अजित पवार थेट अटॅक करतात त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"त्यामुळे एक गोष्ट सांगतो की हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही सगळे निर्णय तिघे मिळून घेतो. मंत्रिमंडळाच्या काही बैठका होतात. त्यापैकी काही बैठकांना अजित पवार असतात तर काही बैठकांना एकनाथ शिंदे असतात. तर काही बैठकांना दोघेही असतात. यावर जो आला नाही तो नाराज असं म्हटलं जातं. माध्यमांना क्वालिटीच्या बातम्या सापडत नाहीये आणि विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाहीये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.