सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:17 IST2025-03-31T11:17:32+5:302025-03-31T11:17:50+5:30

राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही सर्वांना सोबत घेऊन राज्य चालवू, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलं आहे.

Chief Minister devendra fadnavis first reaction to mns Raj Thackerays appeal in gudi padwa speech | सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Devendra Fadnavis: "राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी काल राज ठाकरेंचं भाषण संपूर्ण ऐकू शकलो नाही. मात्र मी जेवढं भाषण ऐकलं त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. या मुद्द्यांवर आम्ही निश्चितपणे विचार करू," असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर आपली भूमिका मांडली आहे. ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं होतं. "राज्यात सध्या जुने मुद्दे उकरून काढून लोकांना भरकटवलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या बहुमताने या सुसंस्कृत राज्याची सत्ता मिळाली आहे. त्यांनी राज्य चांगलं चालवावं. आम्हाला विश्वासात घेऊन राज्य चालवल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल," अशी भूमिका त्यांनी मांडली होती. राज यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही सर्वांना सोबत घेऊन राज्य चालवू, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलं आहे.

राज ठाकरे यांनी काल धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांचाही मुद्दा उपस्थित केला होता. "मशि‍दीवरील भोंग्यांच्या आंदोलनानंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले. उत्तर प्रदेश सरकारने भोंगे हटवण्याचा निर्णय घेतला, पण महाराष्ट्रात अजूनही भोंगे आहेत," अशा शब्दांत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "नियमांच्या बाहेर जे भोंगे आहेत त्यांच्यावर १०० टक्के कारवाई केली जाईल आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकारकडून केलं जाईल."

"एएसआयची प्रोटेक्टेड कबर आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो, पण कायद्याने त्या कबरीला ५०-६० वर्षांपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्या कबरीचं संरक्षण करत आहोत. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही," असं मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

मोदींचा उत्तराधिकारी कोण?

देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आपण या स्पर्धेत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत. २०२९मध्येही आम्ही पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडेच बघतो आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही. भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार केला जात नाही, करायचाही नसतो. असा विचार करणं ही मुघली संस्कृती आहे. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची अजून वेळ आलेली नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा याच्याशी काही संबंधही नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title: Chief Minister devendra fadnavis first reaction to mns Raj Thackerays appeal in gudi padwa speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.