छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन युतीने नागरिकांना फसवले- अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 10:50 PM2019-09-21T22:50:53+5:302019-09-22T06:40:38+5:30

शिवस्वराज्य यात्रेची किल्ले रायगडावर सांगता

Chhatrapati Shivarai's name deceived the citizens by the Alliance | छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन युतीने नागरिकांना फसवले- अमोल कोल्हे

छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन युतीने नागरिकांना फसवले- अमोल कोल्हे

Next

महाड : राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन केवळ जनतेला फसविण्याचे काम केले नाही, तर महाराजांचा अपमान करण्याचे पाप देखील केले आहे. राज्यातील मतदार या सरकारला माफ करणार नाही आणि सत्तेवरून खाली खेचून खऱ्या अर्थाने छ. शिवरायांच्या, महात्मा जोतिबा फुलेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता आणि आघाडीच्या प्रचार सभेत व्यक्त केला.

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप शनिवारी किल्ले रायगडवर करण्यात आला. त्यानंतर महाड शहरातील शिवाजी चौकात यात्रेची सांगता आणि आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्यातील युती सरकारवर आक्रमक भाषेत टीकास्त्र सोडले. गुजरातमध्ये केवळ पाच वर्षांत चार हजार कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला.

महाराष्ट्रात अरबी समुद्रातील शिवस्मारकाची आणि इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक वीट देखील उभी राहिलेली नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे. गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरी मागे घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या जनादेश यात्रेचा समारोप नाशिक येथे झाला. नाशिकला दक्षिण काशी म्हटले जाते. लोक तेथे पाप धुण्यासाठी येतात. मात्र नाशिक येथील सभेने या सरकारवरचे पाप धुतले जाणार नाही अशी टीकाही त्यांनी केली.

किल्ले रायगडावर छ. शिवरायांना अभिवादन केल्यावर ही यात्रा महाडमध्ये आली. चवदार तळ्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या सर्व नेत्यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, आ. संजय कदम, आ. अनिकेत तटकरे, महाडचे माजी आमदार माणिक जगताप, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदी मान्यवरांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी, रायगडच्या भूमीत खंडणी आणि गुंडगिरी करणारा आमदार नको, असे आवाहन मतदारांना केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले. आदित्य ठाकरे महाडमध्ये आले. पण ते रायगडला गेले नाहीत. त्यांनी रायगड चढून दाखवावा असे आव्हानच मिटकरी यांनी त्यांना दिले. महाराष्ट्राचे नेतृत्व हे वाघानेच केले पाहिजे पेंग्विनने नाही असा टोलाही मिटकरी यांनी लगावला.

आघाडीचे सरकार येणार
माजी आमदार माणिक जगताप यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची पुण्यतिथी साजरी करण्याचा कार्यक्रम खा. सुनील तटकरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि आपण जिल्हा परिषद सदस्य असताना केले, राजांचे नाव घेऊन पोट भरणारी जमात राज्य करत आहे. हे लोक स्वत:ला शिवभक्त समजतात. त्यांनी रायगडसाठी काय केले असा सवाल जगताप यांनी विचारला.राज्यात आघाडीचेच सरकार येणार आणि आमदार म्हणून पुन्हा एकदा या मतदारसंघात विकासाची क्रांती घडवून आणण्यासाठी मी देखील सज्ज असणार असा विश्वास जगताप त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील
यांनी भाजप सरकार हे छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची फारकत घडवून आणणारे, जातीयवादी सरकार असल्याचे टीकास्त्र सोडले. जर या सरकारने काम केले असते तर मते मागण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मच्छीमार, आंबा बागायतदार, सुपारी उत्पादक सर्वांच्याच तोंडाला पाने पुसली आहेत आणि म्हणूनच त्यांना मतांचा जोगवा मागण्याची वेळ आली आहे.

Web Title: Chhatrapati Shivarai's name deceived the citizens by the Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.