शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई, चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 11:20 IST2024-08-30T08:25:33+5:302024-08-30T11:20:03+5:30
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन व्यक्तींपैकी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई, चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन व्यक्तींपैकी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कोल्हापूरमधून चेतन पाटील याला ताब्यात घेतले.
मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडूना आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. या दोघांविरोधात पुतळा कोसळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा कारवाई करत पोलिसांनी चेतन पाटील याच्यावर अटकेची कारवाई केली. तर जयदीप आपटे हा ही दुर्घटना घडल्यापासून फरार आहे.
मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतात पसार झालेला चेतन पाटील गेल्या चार दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मालवण पोलिस ठाण्यात बांधकाम सल्लागार डॉ .चेतन पाटील आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजतात बांधकाम सल्लागार चेतन पाटील पसार झाला होता. त्याच्या अटकेसाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून होते. मात्र, दोन्ही मोबाईल बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पाटील याला त्याच्या शिवाजी पेठेतील घरातून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आला.
गतवर्षी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आयोजित करण्यात नौदल दिनानिमित्त येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. मात्र उदघाटन झाल्यापासूनच हा पुतळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा पुतळा सदोष असल्याची टीका संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक शिवप्रेमींनी केली होती. तसेच हा पुतळा बदलून तिथे दुसऱ्या पुतळ्याची स्थापना करावी, अशी मागणीही तेव्हा करण्यात आली होती.