Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:46 IST2025-06-18T11:42:48+5:302025-06-18T11:46:01+5:30
Chhatrapati Sambhajinagar Viral Video: एक-एक रुपया साठवून वयाच्या ९३ वर्षी आजोबांनी त्यांच्या बायकोला सोन्याची पोत केली.

Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
प्राची पाटील / अमोल राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा/जालना/ छत्रपती संभाजीनगर : हलाखीची स्थिती... भिक्षा मागून गुजराण; पण, आपल्या पत्नीवर निस्सीम प्रेम असणाऱ्या ९३ वर्षीय आजोबांना आपण बायकोला आयुष्यात एकही दागिना करू न शकल्याची खंत होती. त्यांनी १-१ रुपया साठवून सोन्याचा नाही पण सोन्याचा मुलामा असलेला दागिना घेतला. आजी-आजोबांचा हा व्हिडीओ रविवारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तेव्हा या दाम्पत्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना जगासमोर आली.
मूळचे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंभोरा जहागीर येथील ९३ वर्षीय निवृत्ती सखाराम शिंदे व शांताबाई निवृत्ती शिंदे हे काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. नुकताच आजोबांनी एका सोन्याच्या दुकानात जाऊन आपल्या पत्नीसाठी दागिना खरेदी केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला. परिस्थिती नसतानाही आजोबांनी पत्नीची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
भावुक करणारा व्हिडीओ
प्रथमदर्शनी गरीब वृद्ध दाम्पत्याने दुकानात प्रवेश करताच ते काही मागण्यासाठी आले असावेत, असे कर्मचाऱ्यांना वाटले. मात्र, आपल्याला पत्नीसाठी पोत खरेदी करायची आहे, असे सांगितले. आजोबांचे पत्नीप्रेम पाहून दुकानमालकाने त्यांना पोत भेट म्हणून देत २० रुपये ‘आशीर्वाद’ म्हणून घेतले. त्यांच्यातल्या संवादाचा व्हिडीओ दुकानदाराने सोशल मीडियावर शेअर केला. त्याला २२.६ मिलियन व्ह्यूज मिळाले. हे वृद्ध दाम्पत्य आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हवी माळ आणि वाटी
सराफा व्यावसायिक नीलेश खिंवसरा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, माझ्या एका शोरूममध्ये रविवारी हे आजी-आजोबा आले. काही तरी घे म्हणून आजोबा आजीला खुणावत होते. परंतु, ते येथून काही न घेताच निघून गेले. काही वेळानंतर ते माझ्या दुसऱ्या शोरूममध्ये आल्याचे कळाले. मी तेथे पोहोचलो. तेथे दोघांशी संवाद साधला. तेव्हा माळ आणि वाटी (मंगळसूत्र) घेण्यासाठी आल्याचे सांगितले. काऊंटरवर १ हजार १२० रुपये ठेवले. चिल्लर पैशांची पोटलीही पुढे केली. मी फक्त १० रुपयांच्या दोन नोटा घेतल्या. एक मुलगा निवर्तला. दुसरा व्यसनी असून लक्ष देत नसल्याचे म्हणाले.