"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 09:46 IST2025-07-06T09:44:57+5:302025-07-06T09:46:29+5:30
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना महापुरूषांबद्दल एक विधान केले. ज्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे.

"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
Sanjay Gaikwad News: हिंदी सक्तीविरोधात तीव्र पडसाद उमटले. सरकारने हिंदीबद्दलचे निर्णय रद्द केले. याच मुद्द्यावर बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह काही महापुरूषांची नावे घेत असे विधान केले, ज्यावर वादाची ठिणगी पडली आहे. विरोधी पक्षाने यावरून संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, "जगामध्ये शिकायचं असेल, तर सगळ्या भाषा अवगत केल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराजा बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ मा साहेब या सगळ्या अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषेसह ते लोक मूर्ख होते का?", असे विधान संजय गायकवाडांनी केले.
"यावर वाद करून मताचे राजकारण करणे चुकीचे आहे. मी तर थेट बोललो, अनेक ठिकाणी बोललो. जर पाकिस्तानचा दहशतवाद रोखायचा असेल, तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे", असे ते म्हणाले.
'दिल्लीची चाकरी आणि सत्तेसाठी लाचार झालेल्यांना...', रोहित पवारांची टीका
संजय गायकवाड यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, " कशाची तुलना कशाशी करावी हे दिल्लीची चाकरी करणाऱ्यांना आणि सत्तेसाठी लाचार झालेल्यांना कधीच कळणार नाही..!"
"ते कळो अथवा ना कळो… पण किमान राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांच्यासह सर्वच महापुरुषांबद्दल बोलताना आब आणि आदर राखायचा असतो, याचं तरी भान या आमदार महाशयांनी ठेवावं", असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला.
"बेभान होऊन हे आपल्या दैवतांचा अवमान करत असतील तर अशा बेभानांना भानावर आणण्याचं काम महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं, अन्यथा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही", असे रोहित पवार म्हणाले.
सत्ताधाऱ्यांची संस्कृती झाली आहे -विजय वडेट्टीवार
संजय गायकवाड यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका केली. "छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांना मूर्ख म्हणतात, कशासाठी तर हिंदी भाषेच्या सक्तीसाठी. सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आपण कशासाठी कोणाचे उदाहरण देतो, भाषा काय वापरतो. महापुरुषांचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे ? या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली", असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.