अखेर अजितदादांनी केला फोन, दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले? छगन भुजबळांनी सगळे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 19:33 IST2025-02-06T19:31:40+5:302025-02-06T19:33:35+5:30
NCP AP Group Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

अखेर अजितदादांनी केला फोन, दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले? छगन भुजबळांनी सगळे सांगितले
NCP AP Group Chhagan Bhujbal News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. यानंतर अतिशय तीव्र शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. अजित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यातच नाराज छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केल्याचे सांगितले जात आहे.
नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी छगन भुजबळ यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणे झाले, याबाबत छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले? छगन भुजबळांनी सगळे सांगितले
पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शिर्डीच्या अधिवेशनासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी येण्याची विनंती केली होती. तेव्हा मी शिर्डीला गेलो होतो.४ दिवसांपूर्वी अजित दादांचा मला फोन आला होता. मी उशिरा फोन करतो, मी दिलगिरी व्यक्त करतो, आपण एकदा बसून बोलूया, असे अजित पवार म्हणाले, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्याबाबत प्रश्न विचारला असता, माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काम होते. त्यामुळे त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. कोणी म्हणतो नाराजी कमी झाली तर का कोणी म्हणतो नाराजी वाढली, त्याचे थर्मामीटर लावून पाहिले पाहिजे, म्हणजे नाराजी कमी झाली की जास्त झाली हे समजेल, असे मिश्किल विधान भुजबळांनी केले.