छगन भुजबळांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 09:11 IST2025-02-05T09:10:40+5:302025-02-05T09:11:02+5:30

रात्री उशिरा सागर बंगल्यावर जात छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

Chhagan Bhujbal meets CM Devendra Fadnavis; makes suggestive statement on BJP entry talks | छगन भुजबळांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर सूचक विधान

छगन भुजबळांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर सूचक विधान

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. या नाराजीनंतर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार असंही बोलले गेले. त्यातच मंगळवारी रात्री उशिरा छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे छगन भुजबळ भाजपात जाणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर भुजबळांना विचारले असता त्यांनीही सूचक विधान केले.

फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आज मी मुख्यमंत्र्‍यांना भेटायला आलो, त्याचं कारण त्यांच्याकडे गृहखातेही आहे. आमच्या येवला पोलिसांच्या घराचा प्रश्न, अधिक पोलीस बळ हवेत यासाठी त्यांना भेटलो. मतदारसंघातील अन्य काही प्रश्न होते त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राजकारणावर फार चर्चा केली नाही असं त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या आढावा बैठकीला तुम्ही गेला नाहीत असं विचारले. तेव्हा माझी जिथे गरज असते तिथे मी जातो, जिथं गरज नाही तिथे जात नाही. मला शिर्डीला बोलावलं होते, मी गेलो होतो असं सूचक विधान केले.

नुकतेच भुजबळांनी राज्यपालपदाच्या ऑफरवर स्पष्टीकरण दिलं होते. मला राज्यपाल पद कुणी ऑफर केले नाही. मी सर्वसामान्य लोकांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर ज्या ज्यावेळी अडचणी येतील, संकट येतात त्या त्यावेळी मला पुढे राहून लढावे लागते. राज्यपालपद मोठे आहे पण मी काही बोलू शकणार नाही, कुणासाठी भांडू शकणार नाही त्यामुळे मला त्या पदापेक्षा मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे पद मोठे आहे असं सांगितले होते.

दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमातही भाजपा प्रवेशावर छगन भुजबळांनी भाष्य केले होते. आता सगळे फुले शाहू आंबेडकरांना मानतात. मंत्रालयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा लावण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांना सांगितली आणि तातडीने त्यांनी ते केले. भिडे वाडाबाबत ताबडतोब मार्ग काढायला त्यांनी सांगितले. मला त्यांच्यासोबत काम करायला काही अडचण नाही. ओबीसींना ते सपोर्ट करत असतील आणि फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावर चालत असतील तर मला भाजपासोबत काम करायला काही हरकत नाही असं भुजबळांनी थेट सांगितले होते. 

Web Title: Chhagan Bhujbal meets CM Devendra Fadnavis; makes suggestive statement on BJP entry talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.