"ती माणसं नाहीत का?"; छगन भुजबळांचा विधानसभेतून आमदार सुरेश धसांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:38 IST2025-03-06T13:34:22+5:302025-03-06T13:38:41+5:30
परभणीतील हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावरून छगन भुजबळांनी उलट सवाल केला.

"ती माणसं नाहीत का?"; छगन भुजबळांचा विधानसभेतून आमदार सुरेश धसांना सवाल
Chhagan Bhujbal Suresh Dhas News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना घेरणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांची राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कोंडी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छगन भुजबळांनीसुरेश धसांच्या एका विधानावर बोट ठेवलं. 'सोमनाथ सूर्यवंशी हा माणूस नाहीये का? संविधान सगळ्यांसाठी समान नाहीये का?, असे सवाल केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत चर्चा सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यात घडत असलेल्या क्रूर घटनांवर चिंता व्यक्त केली.
बीडमधील संतोष देशमुख, परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी, लातूर जिल्ह्यातील माऊली सोट यांची हत्या तसेच नुकतीच जालना जिल्ह्यातील कैलास बोऱ्हाडे या धनगर व्यक्तीवरील अत्याचार या गंभीर प्रकरणांबद्दल ते बोलले. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुरेश धस यांना उल्लेख न करता सवाल केला.
छगन भुजबळ सुरेश धसांना काय म्हणाले?
"परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीची मोडतोड कुणीतरी केली म्हणून आंदोलन झालं. त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं, सोमनाथ सूर्यवंशी! तो पोलीस कोठडीत मृत्यूमुखी पडला. त्याची आपण चौकशी करणार नाही?", असा सवाल भुजबळांनी सरकारला केला.
"मला आश्चर्य तेव्हा वाटलं, ज्यावेळी बीडच्या प्रकरणात आवाज उठवणारे आपली माणसं म्हणतात, जाऊद्या त्या प्रकरण, त्यांना दुर्लक्ष करा म्हणजे माफ करा. पण, का?", प्रश्न भुजबळांनी धसांना नाव न घेता केला.
ते माणसं नाहीत का?
विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "ती माणसं नाहीत? तो मागासवर्गीय आहे म्हणून? दलित समाजाचा आहे म्हणून? माणूस आहे ना? संविधान सगळ्यांसाठी सारखं आहे ना? गर्जा महाराष्ट्र माझा, माझा महाराष्ट्र नाहीये? मग दलित समाजाच्या कुणावर जर अत्याचार झाला असेल, तर आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार?", असा रोकडा सवाल भुजबळांनी विधानसभेत स्वतःच्या सरकारला केला.
सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात काय बोलले होते?
आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर कारवाईची मागणी करत मुंबईपर्यंत लाँग मार्च काढला होता. पण, या मोर्चाचा नाशिकमध्ये समारोप झाला होता. याच ठिकाणी बोलताना सुरेश धस यांनी, "पोलिसांची कानउघाडणी झाली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं योग्य होणार नाही. त्या पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा", अशी भूमिका मांडली होती. त्यावरून टीका झाली आणि नंतर सुरेश धसांनी खुलासाही केला होता.