"तुझ्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या..."; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला चांगलंच झापलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 20:08 IST2025-02-20T19:59:40+5:302025-02-20T20:08:24+5:30
Swara Bhaskar vs BJP Chitra Wagh: स्वरा भास्करने छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास काल्पनिक असल्याचे म्हटले होते

"तुझ्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या..."; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला चांगलंच झापलं
Swara Bhaskar vs BJP Chitra Wagh: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावरून ती अनेकदा विचित्र विचार मांडते आणि त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठते. याचीच पुनरावृत्ती नुकतीच घडली. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित विकी कौशलचा (Vicky Kaushal) छावा (Chhaava) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या सिनेमाला भरपूर प्रेम मिळतंय. असे असताना काल, शिवजयंतीच्या दिवशी स्वरा भास्कर हिने एक ट्विट केले. त्यात महाकुंभमेळा, दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेली चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटावरून विधान करून नवा वाद ओढवून घेतला. तिला भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
"स्वरा भास्कर यांना कुठे काय बोलायचं याचं तारतम्य उरलं नाही हे नक्की. दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती आणि आहे. पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती. स्वरा भास्कर, आमचे छत्रपती संभाजी राजे हे काल्पनिक नव्हते. त्यांच्यावरती क्रूर अत्याचार करणारा औरंग्यादेखील काल्पनिक नव्हता हे तर तू मान्य करशीलच. त्यामुळेच आमच्या राजावरती होणारे अत्याचार पाहून प्रत्येक संवेदनशील मनाला त्रास झाला आणि त्या औरंग्याचा प्रचंड राग आला. त्यामुळेच प्रत्येक भारतीयाला हा इतिहास समजायलाच हवा, जो तुमच्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या लोकांनी सोयीने बदलला. आजही जेव्हा सत्य समोर येतंय, खरा इतिहास लोकांना कळतोय, तेव्हा तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेकांना पोटशूळ का होतोय? हे समस्त भारतीयांना चांगलंच उमगलंय. त्यामुळेच आमच्या महाराजांबद्दल गरळ ओकणं बंद कर. तुमच्या सारख्या मुर्दाड मनाच्या लोकांची आता कीव येऊ लागली आहे," असे अतिशय बोचऱ्या शब्दांत चित्रा वाघ यांनी स्वराला झापले.
स्वरा भास्कर यांना कुठे काय बोलायचं याचं तारतम्य उरलं नाही हे नक्की...
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 20, 2025
दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती .. आणि आहे.
पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती.
स्वरा भास्कर आमचे छत्रपती संभाजी राजे हे…
स्वरा भास्कर काय म्हणाली होती?
"व्यवस्थापनातील अभावामुळे चेंगराचेंगरीत लोकांचे भयावह मृत्यू झाले. बुलडोझरच्या मदतीने त्यांचे मृतदेह काढावे लागल्याचे सांगितले गेले. यावर चिंता न व्यक्त करता समाज ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक फिल्मी अत्याचारांवर जास्त संताप व्यक्त करतोय. हा समाज मनाने आणि आत्म्याने पूर्णपणे मुर्दाड बनलाय," असे स्वराने सोशल मीडियावर लिहिले होते.
A society that is more enraged at the heavily embellished partly fictionalised filmy torture of Hindus from 500 years ago than they are at the horrendous death by stampede & mismanagement + then alleged JCB bulldozer handling of corpses - is a brain & soul-dead society. #IYKYK
— Swara Bhasker (@ReallySwara) February 18, 2025
दरम्यान, केवळ राजकीय मंडळीच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील लोकांनी स्वरा भास्करवर टीका केली आहे.