Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 01:00 IST2025-10-27T00:58:54+5:302025-10-27T01:00:02+5:30
मूळचा वाशिम जिल्ह्यातील असलेल्या आणि पुण्यात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीने घरी जात असताना दोन जुळ्या मुलींची गळा चिरून हत्या केली.

Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
Buldhana Crime News: एक क्षणिक राग, मानसिक ताण आणि असह्य वेदना आणि त्याचक्षणी संपले दोन चिमुकल्या जिवांचे आयुष्य. वाशिम जिल्ह्यातील रुई (गोस्ता) येथील रहिवासी राहुल शेषराव चव्हाण (३३) या तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या अडीच ते तीन वर्षांच्या जुळ्या मुलींचा चाकूने गळा चिरून अमानुषपणे खून केल्याची घटना अंढेरा परिसरात २५ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे.
प्रणाली आणि प्रतीक्षा अशी मृत मुलींची नावे आहेत. थरकाप उडवणाऱ्या या घटनेने अंढेरा परिसर शनिवारी हादरून गेला.
राहुल हा पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होता. पत्नी आणि जुळ्या मुलींसह तो तिथेच वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी नवरा-बायकोत किरकोळ वाद झाला.
रस्त्यात गाडी थांबवली आणि दोन मुलींची हत्या केली
पत्नी माहेरी गेल्यानंतर मानसिक तणावाखाली राहुलने १८ ऑक्टोबर रोजी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन दुचाकीवरून पुण्याहून वाशिमकडे प्रयाण केले. प्रवासादरम्यान २१ ऑक्टोबर रोजी दुपारी अंढेरा फाट्याजवळील ई-क्लास जमिनीजवळ त्याने दुचाकी थांबवून रागाच्या भरात दोन्ही मुलींचा गळा चिरून निर्दयपणे खून केला.
१८ तारखेला तो पुण्याहून निघाला असला तरी त्याच्या डोक्यात चिमुकल्यांना संपवून स्वतःलाही संपविण्याचा विचार सुरू होता. त्यातूनच तो अंढेऱ्याच्या दिशेने वळला, असे ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी सांगितले.
आईवडिलांना सांगितला घटनाक्रम
घटनेनंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आणि आपल्या गावी रुई (गोस्ता) येथे पोहोचला. राहुलचे आई-वडील आणि आठ वर्षांचा मुलगा सध्या रुई गावातच राहतात. नातेवाइकांना हा प्रकार सांगून त्याने आसेगाव पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.