भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:48 IST2025-11-17T11:48:05+5:302025-11-17T11:48:42+5:30
Sanjay Raut News: आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले.

भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना गंभीर आजारपणामुळे सार्वजनिक जीवनापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय़ घ्यावा लागला आहे. सध्या आजारपणावर उपचार घेत असलेले संजय राऊत हे सोशल मीडियावरून आपली मतं मांडत आहेत. दरम्यान, आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले.
आपल्या बोचऱ्या टीकेने आणि टोकदार शब्दांनी विरोधकांचे वाभाडे काढणारे संजय राऊत यांना अचानक उदभवलेल्या आजारामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा अवघड निर्णय घ्यावा लागला होता. तेव्हापासून संजय राऊत हे सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. दरम्यान, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी संजय राऊत यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित राहत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
थकलेलं शरीर आणि तोंडावर मास्क लावलेले संजय राऊत भाऊ सुनील राऊत यांचा हात हातात घेत शिवाजी पार्कवर दाखल झाले. तिथे त्यांनी उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. त्यानंतर संजय राऊत बाहासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले. आजारपणाचा सामना करत असतानाही संजय राऊत हे लढाऊ बाणा दाखवत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी आल्याने उपस्थित शिवसैनिकही भारावून गेलेले दिसले.