गॅसचा काळाबाजार; वाशीत १८ सिलिंडर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 10:30 IST2026-03-15T10:29:40+5:302026-03-15T10:30:08+5:30

काळ्या बाजारात गॅस सिलिंडरचा दर दोन हजारांपर्यंत

Black market of gas; 18 cylinders seized in Vashi | गॅसचा काळाबाजार; वाशीत १८ सिलिंडर जप्त

गॅसचा काळाबाजार; वाशीत १८ सिलिंडर जप्त

धाराशिव : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कामांसाठी होणारा बेकायदेशीर वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या धडक मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी वाशी तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये १८ घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आले असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे.

घरगुती वापराच्या गॅसचा हॉटेल, ढाबे आणि औद्योगिक कारखान्यांमध्ये सर्रास वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय विशेष दक्षता पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके अचानक धाडी टाकून तपासणी करीत आहेत. मोहिमेच्या पहिल्या दिवशी पथकांनी जिल्ह्यातील ८१ धाबे, हॉटेल्स आणि औद्योगिक आस्थापनांची कसून तपासणी केली. यामध्ये वाशी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी घरगुती सिलिंडर व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याचे उघड झाले. पथकाने तत्काळ १८ सिलिंडर जप्त केले. घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान हे केवळ सर्वसामान्यांसाठी असते, त्याचा व्यावसायिक वापर करणे गुन्हा आहे.

काळ्या बाजारात गॅस सिलिंडरचा दर दोन हजारांपर्यंत
कोल्हापूर : आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबताच कोल्हापुरात काळ्या बाजारातून दुप्पट दराने एलपीजी सिलिंडरची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. काही गॅस वितरक आणि तस्करांचे साटेलोटे असल्याने घरगुती वापराचे सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी दिले जात आहेत.  अनेक दिवस सिलिंडर न घेतलेल्या ग्राहकांच्या नावावरील सिलिंडर परस्पर दुप्पट दराने विकले गेल्याचे प्रकार उघडकीस आल्याने ग्राहक चक्रावले आहेत. काळ्या बाजारात गॅस सिलिंडरचा दर दोन हजारांपर्यंत पोहोचला आहे. 

गेल्या आठ-दहा वर्षांपासून जिल्ह्यात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरू होता. यातच पाइप लाइनची सुविधा उपलब्ध झाल्याने सिलिंडर पुरवठ्याचा ताण आणखी हलका झाला. त्यामुळे अतिरिक्त असलेले घरगुती वापराचे सिलिंडर काळ्या बाजारातून व्यावसायिक वापरासाठी दिले जात होते. विशेषतः हॉटेल्स, खाद्य पदार्थांच्या गाड्या, चहा टपऱ्या, रिक्षाचालक आणि औद्योगिक वसाहतींमध्ये ही घरगुती वापराचे सिलिंडर बिनबोभाट पोहोचत होते. 

इराणमध्येयुद्धाचा भडका उडताच भारतातील गॅसचा पुरवठा खंडित झाला. याचे परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहेत. कोल्हापुरात काळ्या बाजारातील तस्कर सक्रिय झाले आहेत.  काही गॅस वितरकांशी साटे-लोटे करून तस्कर घरगुती वापराचे सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना विकत आहेत. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची विक्री बंद असल्यामुळे काळाबाजार वाढला आहे.

कोळसा शेगड्यांचा आधार
सटाणा - नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत. शहरात काही ठिकाणी २१०० रुपये मोजूनही व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांना कोळशाच्या शेगड्यांवर अवलंबून रहावे लागत आहे.

Web Title : गैस का काला बाज़ार: वाशी में 18 सिलेंडर जब्त

Web Summary : काला बाज़ारी पर कार्रवाई में होटलों में अवैध इस्तेमाल उजागर। वाशी में 18 सिलेंडर जब्त। कोल्हापुर में आपूर्ति समस्या से कीमतें बढ़ीं, जबकि सटाणा में कमी से कोयला इस्तेमाल।

Web Title : Black Market Gas: 18 Cylinders Seized in Vashi Crackdown

Web Summary : Crackdown on black market gas reveals illegal use in hotels. 18 cylinders seized in Vashi. Kolhapur sees prices surge amid supply issues, while Satana faces shortages, forcing coal stove use.