Anil Desai: "आधी मतचोरी केली, आता पक्षाचे बी फॉर्मही चोरले" अनिल देसाई यांची निवडणूक आयोगावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:12 IST2025-11-20T10:12:47+5:302025-11-20T10:12:47+5:30
Anil Desai Slams EC: निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर व निर्धारित मुदत संपल्यानंतर नियमांत केलेला बदल हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे, असा आरोप उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी पत्र परिषदेतून केला.

Anil Desai: "आधी मतचोरी केली, आता पक्षाचे बी फॉर्मही चोरले" अनिल देसाई यांची निवडणूक आयोगावर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर व निर्धारित मुदत संपल्यानंतर नियमांत केलेला बदल हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे, असा आरोप उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी पत्र परिषदेतून केला. राज्य निवडणूक आयोगाच्या या अचानक बदललेल्या नियमांचा अनेक डमी उमेदवारांना फटका बसणार आहे. आधी मतचोरीचे प्रकार केले तर आता पक्षाचे ‘बी फॉर्म’ चोरण्यात आल्याचा आरोप अनिल देसाई यांनी बुधवारी पत्र परिषदेतून केला. या नव्या नियमांचा परिणाम म्हणून पूर्वी स्वीकृत झालेल्या अनेक अर्जांना नंतर बाद करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.
राहातामध्ये काय घडले?
राहाता नगरपरिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवत आहे. येथे उद्धवसेनेच्या नावाने काहींनी चार उमेदवारी अर्ज अनधिकृतरीत्या दाखल केले असून त्यासोबत पक्षाचे ‘बी फॉर्म’ देखील जोडले होते. ही माहिती कळताच निवडणूक अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात तक्रार करूनही संबंधित अर्ज वैध ठरविण्यात आले शिवाय पोलिसांनीही या प्रकरणाची तक्रार स्वीकारण्यास नकार दिला, असे खा. देसाई म्हणाले.
निवडणुकीचा फार्स का?
कोणता पक्ष वा व्यक्तीचा दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे का? असा सवाल करून खा. अनिल देसाई म्हणाले, आयोगाकडून कारवाई होणार नसेल तर हा निवडणुकीचा फार्स कशासाठी? यापेक्षा निवडणूकच घेऊ नका. आयोग स्वायत्त म्हणवून घेत असला तरी त्याचे कामकाज स्वायत्तपणे होताना दिसत नाही, असे म्हणाले.