खेड - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपामनसेला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. कोकणातील मनसेचा मोठा चेहरा म्हणून ओळख असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर सध्या भाजपाच्या वाटेवर असल्याचं समोर आले आहे. वैभव खेडेकर हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून खेडेकर मनसेत नाराज असल्याचे बोलले जाते. त्यांची ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मनसे नेत्यांनी केला परंतु खेडेकर मनसे सोडणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मनसेची स्थापना केली, तेव्हापासून वैभव खेडेकर मनसेसोबत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेत वैभव खेडेकर यांच्या रुपाने मनसेने पहिल्यांदा नगरपालिकेत सत्ता आणली होती. खेडेकर हे मनसेचे पहिले नगराध्यक्ष होते. अलीकडच्या काळात खेडेकर पक्षात नाराज असल्याचे बोलले गेले. मात्र आता वैभव खेडकर मनसेला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील या चर्चांना बळ आले आहे. खेडेकर यांच्या निकटवर्तीयांकडूनही त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित असल्याची कुजबुज आहे.
कोण आहेत वैभव खेडेकर?
वैभव खेडेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख आहे. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत आहेत. २०१४ साली त्यांनी दापोली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. खेड नगरपरिषदेत मनसेची सत्ता आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. यापूर्वी ते खेडचे नगराध्यक्ष राहिले होते. वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष बराच काळ सुरू होता. परंतु हा संघर्ष कमी करत रामदास कदमांनी खेडेकर यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. खेड आणि दापोली परिसरात वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खेडेकर यांच्यावर सध्या मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटकपदाची जबाबदारी आहे. परंतु गणेशोत्सवानंतर वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
काय म्हणाले होते वैभव खेडेकर?
मध्यंतरी नाराजीच्या बातम्या सुरू असताना काही माध्यमांना मुलाखत देताना वैभव खेडेकर म्हणाले होते की, मी ३० वर्ष साहेबांसोबत पक्ष स्थापनेपासून आहे. मी नाराज वैगेरे नव्हतो. माझे जे काही म्हणणं होते ते मी मांडले होते. माझ्या नाराजीची बरीच चर्चा माध्यमांत झाली. इतर पक्षात जाणार वैगेरे बातम्या चालल्या. मला दुसऱ्या पक्षांच्या ऑफर असल्या तरीही मी अडचणीच्या काळात पक्षासोबत आहे आणि भविष्यातही राहील. आमचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांनी मला बोलावले. माझं म्हणणं ऐकले, आमची चर्चा झाली. आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे नाही. मी नाराज होऊन घरी बसलो नाही. आजही मी रणांगणात आहे. प्रलोभन आणि निष्ठा यात निष्ठा महत्त्वाची आहे. मी राजसाहेबांची साथ सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.