भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 20:45 IST2025-11-20T20:44:25+5:302025-11-20T20:45:02+5:30
नगराध्यक्षपदाच्या निवडीसह भाजपला सहा नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आणण्यात यश आले आहे. माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजप वगळता दाखल झालेले सर्व अर्ज मागे घेण्यात आले.

भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले...
जामनेर (जळगाव): जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर नगरपालिकेतील राजकीय दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे, गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
या विजयामुळे जामनेर नगरपालिकेची सत्ता भाजपच्या हातात बिनविरोध आली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीसह भाजपला सहा नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आणण्यात यश आले आहे. माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजप वगळता दाखल झालेले सर्व अर्ज मागे घेण्यात आले.
भाजप उमेदवार: नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून साधना महाजन यांनी अर्ज दाखल केला होता.
माघार घेतलेले उमेदवार: महाविकास आघाडीकडून रूपाली ललवाणी, प्रतिभा झाल्टे आणि सरिता बोरसे यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु तिन्ही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबद्दल मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, आणि जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.