राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:30 IST2025-08-29T16:30:16+5:302025-08-29T16:30:39+5:30

Sanjay Raut on BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP will go to any extent to defame Rahul Gandhi; Sanjay Raut's criticism | राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut on BJP : बिहारमध्ये काँग्रेसच्या 'मतदार हक्क यात्रे' दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईच्या नावाने शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावरुन सध्या राजकारण तापले असून, भाजप सातत्याने राहुल गांधींवर टीका करत आहेत. अशातच, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडले आहे. 'राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते,' असे राऊत म्हणाले.    

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना विचारण्यात आले की, 'मतदार हक्क यात्रे'तून पंतप्रधान मोदींना बदनाम केले जात आहे का? यावर राऊत म्हणाले, "कोण शिवीगाळ करत आहे? काही कार्यकर्ते शिवीगाळ करत असतील. पण, भाजपनेच त्यांचे लोक सभेत सोडले असतील. चांगल्या कामाची बदनामी करण्यासाठी, मतदार हक्क यात्रेची आणि राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजपचे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. महाराष्ट्रात आम्हाला अनुभव आहे. शिवी देणारे त्यांचेच लोक असले पाहिजेत,' अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.

'मतदार हक्क यात्रे'दरम्यान PM मोदींना शिवीगाळ
बिहारमधील दरभंगातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात 'मतदार हक्क यात्रे'दरम्यान मंचावरुन पंतप्रधान मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. त्यावेळी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव मंचावर उपस्थित नव्हते, तरीदेखील भाजपने राहुल यांना माफी मागण्याची मागणी केली आहे.

पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'

अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा 
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले, जर काँग्रेस खासदार राहुल गांधींना थोडीही लाज शिल्लक असेल, तर त्यांनी पंतप्रधान मोदी आणि देशातील जनतेची माफी मागावी. यासोबतच गृहमंत्र्यांनी राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रे'ला 'घुसखोर बचाओ यात्रा' असे संबोधले.

Web Title: BJP will go to any extent to defame Rahul Gandhi; Sanjay Raut's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.