“लिहून घ्या, सावरकरांचा अपमान केला, आता सिद्धरामय्यांचे सरकार पडणार”; भाजपा नेत्यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:39 IST2024-12-10T14:39:09+5:302024-12-10T14:39:40+5:30
Veer Savarkar Photo Frame In Karnataka Assembly News: वीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणारे एकतर पराभूत झालेत किंवा बुडलेत. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली.

“लिहून घ्या, सावरकरांचा अपमान केला, आता सिद्धरामय्यांचे सरकार पडणार”; भाजपा नेत्यांची टीका
Veer Savarkar Photo Frame In Karnataka Assembly News: कर्नाटकातीलकाँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. वीर सावरकरांचे राज्यासाठी कोणतेही योगदान नव्हते, असा दावा कर्नाटकातीलकाँग्रेस सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सन २०२२ मध्ये बसवराज बोम्मई यांच्या सरकारने वीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला होता. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, भाजपाने आक्रमक होत काँग्रेसवर टीका केली आहे.
हे खूप गंभीर आहे, कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. ते एकतर पराभूत झालेत किंवा बुडलेत. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे. हे विश्वासाने सांगतोय लिहून घ्यावे. पुढील निवडणुकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव होईल. कारण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, या शब्दांत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार?
सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही, या शब्दांत महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला होता.
दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते.