“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 19:36 IST2025-07-07T19:36:41+5:302025-07-07T19:36:41+5:30
BJP Sudhir Mungantiwar News: नवीन विद्यार्थी आल्याने मेरिटच्या विद्यार्थ्यांवर काही परिणाम होत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
BJP Sudhir Mungantiwar News:उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. कायमचे एकत्र येण्यासाठीचे स्पष्ट संकेत मिळाले, पण तशी घोषणा करण्यात आली नाही. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, भाजपा, शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.
पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी काही नाराज नाही. माझी पक्षातून कोंडीही केली जात नाही. अधिवेशनात गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यात काही गैर नाही. ते आमदाराचे कर्तव्यच असते. प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असे होत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही
दोन भाऊ हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. नवीन विद्यार्थी आल्याने मेरिटच्या विद्यार्थ्यांवर काही परिणाम होत नाही, तसा आमच्यावरही काही परिणाम होणार नाही. त्यांनी आपला अभ्यास करायचा. नव्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करायचा आहे. सत्ता हे आमच्या पक्षाचे कधीच ध्येय नव्हते. सत्तेसाठी आमच्या पक्षाला काहीही करायची आवश्यकता नाही. दोन भाऊ एकत्र आले आहेत तर भाजपाच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आमचा विरोध असायचे काही कारण नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या क्षणामुळे शिवसैनिकांसह मनसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला. परंतु, आता आगामी महापालिका निवडणुकांमध्येही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, राज ठाकरे सोबत आले तर ते महाविकास आघाडीत सामील होणार की फक्त ठाकरे गटाशी युती करणार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले, तर काँग्रेसची भूमिका काय असणार, अशा अनेक प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.