एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:57 IST2025-03-06T13:52:25+5:302025-03-06T13:57:12+5:30
Maharashtra Politics News: एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी
Maharashtra Politics News: मुंबई, ठाणे, पुणे यासह राज्यभरातील अनेक महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय महापालिका निवडणुका होऊ शकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी आता ६ मे रोजी होणार आहे. असे असले तरी राज्यातील सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे यासह काही ठिकाणी नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबईत सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत अगदी थोड्या जागा भाजपाला कमी पडल्या होत्या. परंतु, आता मात्र भाजपा कंबर कसून तयारीला लागला आहे. तर शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीनंतर होणारी ही पहिली महापालिकेची निवडणूक असणार असून, शिंदे गटाची महत्त्वाची साथ भाजपाला मिळणार आहे. उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी महायुती प्रयत्नशील असणार आहे. परंतु, ठाणे महापालिका भाजपासाठी महत्त्वाची मानली जात आहे. ठाण्यात एक हाती सत्ता मिळण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी एका बड्या नेत्यावर जबाबदारी देण्यात आल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे.
रात्री शिंदेंचा पाहुणचार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. हे काम वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर आहे. मात्र, नाईकांचा बालेकिल्ला नवी मुंबईत शिंदेसेना बिनधास्त आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने गळाला लावलेले नाईक समर्थक माजी नगरसवेक अद्यापही शिंदेंच्या दावणीला आहेत. यात पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर बाईट देण्यात हे लोक आघाडीवर होते. हे लोक दिवसा दादांचा प्रचार, रात्री शिंदेंचा पाहुणचार घेणारे असल्याची चर्चा नाईक कार्यकर्त्यांत आहे.
दरम्यान, शिंदेसेनेने ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे काम सुरूच ठेवले आहे. राज्यभरातून अनेक आजी-माजी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. एकीकडे तोंडावर आलेली महापालिका आणि दुसरीकडे पक्षातील गळती थांबता थांबत नसल्याची स्थिती या दोन्ही आघाड्यांवर उद्धव ठाकरेंना कसरत करावी लागत आहे. जायचे त्यांना जाऊ द्या, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरेंना मुंबई, ठाणे आणि अन्य ठिकाणी महापालिका चांगलीच जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही झाले तरी मुंबई महापालिका राखायचीच असा चंग उद्धव ठाकरेंनी बांधला असून, त्यादृष्टीने ठाकरे गटाने तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.