भाजप-सेनेत मतप्रदर्शन, पण, गैरसमज होणार नाहीत; मंत्री आशिष शेलारांनी केले स्पष्ट

By नितीन काळेल | Updated: June 11, 2025 19:33 IST2025-06-11T19:32:21+5:302025-06-11T19:33:21+5:30

जिल्ह्यातील निवडणुकीबाबत भाजप जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील 

BJP Sena to hold vote demonstration, but there will be no misunderstandings; Minister Ashish Shelar clarifies | भाजप-सेनेत मतप्रदर्शन, पण, गैरसमज होणार नाहीत; मंत्री आशिष शेलारांनी केले स्पष्ट

भाजप-सेनेत मतप्रदर्शन, पण, गैरसमज होणार नाहीत; मंत्री आशिष शेलारांनी केले स्पष्ट

नितीन काळेल 

सातारा : ठाकरे बंधू आणि पवारही एकत्र येणार हे त्या दोघांनाही माहीत आहे का ?, अगोदर त्यांना ठरवू द्या. दोघांपैकी कोणीही त्याबद्दल सांगू द्या, त्यानंतरच आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ, असे खोचक उत्तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. तसेच, सातारा जिल्ह्यातील आगामी निवडणुकीबाबत भाजप जिल्हाध्यक्ष निर्णय घेऊन काय ते सांगतील, असेही एका प्रश्नावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.  
 
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी मंत्री शेलार यांनी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. राज्य शासनाच्या वतीने आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी आल्यावर पत्रकारांशी ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार डाॅ. अतुल भोसले, माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर, मदन भोसले, आमदार मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.

मंत्री शेलार म्हणाले, सातारा जिल्ह्यात सातारा आणि परिसरातील भाग हा चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणासाठी उत्तम ठिकाण आहे. याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत धाेरण निश्चित करण्यात येईल. जलसंधारण विभागातील बदल्यात अनियमितता असल्याबाबतच प्रश्न करण्यात आल्यावर त्यांनी याबाबत संबंधित मंत्री योग्य काम करत असतील, असे सूचक वक्तव्य केले. तसेच, सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वत: लढणार की, युती करून, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री शेलार यांनी हा अधिकार भाजप जिल्हाध्यक्षांचा आहे. योग्यवेळी निर्णय होईल. त्यानंतर जिल्हाध्यक्षच काय ते सांगतील, असे उत्तर दिले.

भाजप-सेनेत मतप्रदर्शन; पण, गैरसमज होणार नाहीत..

पत्रकारांनी भाजप आणि शिंदेसेनेत धुसफूस सुरू आहे. सातारा जिल्ह्यातही सेनेच्या विरोधातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. पालकमंत्र्यांची काेंडी केली का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री शेलार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई हे महायुतीतील आहेत. अनुभवी आहेत. दोन्ही पक्षांत धुसफूस नाही. मतप्रदर्शन आहे. पण, आमच्यात गैरसमज होणार नाहीत याची चिंता करू, असे स्पष्ट केले. तर मंत्री नीतेश राणे यांच्याबद्दलच्या प्रश्नावर त्यांनी याबाबत मुख्यमंत्री बोलले आहेत, असे सांगून अधिक बोलणे टाळले.

Web Title: BJP Sena to hold vote demonstration, but there will be no misunderstandings; Minister Ashish Shelar clarifies