देशाचे संविधान बदलून भारत बनवण्याचा भाजपा-RSS चा डाव हाणून पाडा: काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:45 IST2026-03-13T19:44:48+5:302026-03-13T19:45:43+5:30
BJP vs Congress: भाजपाला 'अब की ४०० पार' हे संविधान बदलण्यासाठी हवं आहे, अशीही केली टीका

देशाचे संविधान बदलून भारत बनवण्याचा भाजपा-RSS चा डाव हाणून पाडा: काँग्रेस
BJP vs Congress: देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. पण या विचारधारेला छेद देऊन लोकांना लाचार बनवणारी शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा विचार भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. संविधान विरूद्ध मनुवाद या लढाईत माजी सरसंघचालक गोळवलकर यांच्या 'बंच ऑफ थॉट'वर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा भाजपा व संघाचा डाव हाणून पाडा व संविधानाचा विचार अंगिकारा. तोच विचार देशाला ताराणारा आहे," असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. त्र्यंबकेश्वर येथील कार्यशाळेच्या सांगता कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "राजसत्ता व धर्मसत्ता ही मुठभर विशेष लोकांच्या हाती असावी हा संघाचा विचार आहे. सत्ता, संपत्ती, द्वेष, भय, यातून धर्मांध राजकारण करत आहे. अधिकार नाकारणारा, हम करे सो कायदा हा भाजपा विचार आहे. मागील काही वर्षात हा मनुवाद वाढत आहे. अब की ४०० पार कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी भाजपाला हवा आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला."
"काँग्रेसची विचारधारा संविधानाची विचारधारा आहे. समता, बंधुता, शांती, सर्वांना समान न्याय हक्क, स्त्री पुरुष समानता असा आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, वारकरी संप्रदायाचा विचार आहे, महापुरूषांचा विचाराला एक प्रवाह आहे आणि तो काँग्रेसचा विचार आहे. भाजपाची आयडिया ऑफ इंडिया व काँग्रेस ची आयडिया ऑफ इंडिया यात मोठा फरक आहे. आपल्याला काँग्रेस च्या आयडिया ऑफ इंडियाचा विचार पुढे घेऊन जायचे आहे. काँग्रेस च्या विचारानेच शिक्षण हक्क कायदा, मनरेगा, माहितीचा अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा दिला. काँग्रेसचा आत्मा व देशाचा आत्मा एकच आहे," असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
समारोपाच्या भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वसंत पुरके यांनी आपल्या भाषणातून भाजपा सरकारच्या राजकारणावर टीका केली. "भाजपाची फोडा आणि राज्य करा निती असून समाजात जाती धर्मांमध्ये भांडणे लावून भाजपा राजकीय पोळी भाजत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानामुळे आणि काँग्रेस सरकारांनी राबवलेल्या धोरणांमुळे या देशातील गरीब, ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी समाजाला शिक्षण व अधिकार मिळाले. त्यामुळे ते मुख्य प्रवाहात आले. भाजप सरकार हळूहळू या सर्वांचे हक्क काढून घेत आहे. त्यांच्या कल्याणकारी योजनांवरील निधीची कपात करत आहे. विकासाची स्वप्ने दाखवून भाजप समाजात विभागणी करत आहे. भाजपाच्या दडपाशाहीला व भूलथापांना बळी पडू नका, काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो," असे वसंत पुरके म्हणाले.