"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:29 IST2025-03-13T13:28:05+5:302025-03-13T13:29:09+5:30
BJP Ram Kadam on Aaditya Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
आदित्य ठाकरे यांनी माईक आणि लाऊडस्पीकर लावण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. "या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची, ही कसली निती?" असा सवाल करत महायुती सरकारला घेरलं. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपा नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली. त्या उबाठाला आता हिंदू सण आठवले" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच "आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही. कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्यांना हे सरकार माफ करणार नाही" असंही म्हटलं आहे.
"उबाठाला आता हिंदू सण आठवले"
"हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली. त्या उबाठाला आता हिंदू सण आठवले. सत्तेच्या काळात वसुलीबाज आणि कोरोनाकाळात खिचडीचोर अशी प्रतिमा तुमची. वाईन शॉप आणि बियर बार आधी उघडलेत. आम्ही रस्त्यावर आंदोलन केली तरी देखील मंदिरांना टाळं लावणारे तुम्ही आणि आता आम्हाला सांगता... हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे."
"कोणत्याही सणाला, उत्सवाला बंदी नाही"
"आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही. कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्यांना देखील हे सरकार माफ करणार नाही. पण तुमचे उरलेसुरलेले आमदार आणि खासदार, तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून तुम्हाला सोडून जातील आणि खऱ्या शिवसेनेकडे वळतील, म्हणून अशा प्रकारचे उपद्व्याप युवराज करत आहेत" असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?"
आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं. "महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय... आणि आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी 'माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम' दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरु आहे... या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? 'चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची', ही कसली निती?" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.