BJP Pravin Darekar News: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक जण शिवसेना शिंदे गटात सामील होत आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. एकीकडे स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली असली, तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालल्याचे दिसत आहे. असेच सुरू राहिल्यास आगामी महापालिका निवडणुका या ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते, असे सांगितले जात आहे. राजन साळवी यांच्यानंतर अनेक कोकणातील नेते, पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात या घडामोडी सुरू असताना आदित्य ठाकरे दिल्लीत गेले. यावरून भाजपाने टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबतच नव्हे तर महाराष्ट्राशी गद्दारी केली. अनेक लोक पक्ष सोडतात, पक्षातून बाहेर जातात पण यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचे पाप, दिलेले नाव चोरण्याचे पाप, चिन्ह चोरण्याचे पाप केले, त्याचा आम्हाला राग आहे. महाराष्ट्रात जी सुख, शांती, समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो तेदेखील दुसऱ्या राज्यात पाठवण्याचे पाप शिंदेंनी केले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच लाडकी बहीण योजना, पालकमंत्रीपदाचा वाद यांवरूनही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी, असे आदित्य ठाकरेंनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. यावरून भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यापूर्वी परवानगी घेतील होती का?
मीडियाशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, अनेक आमदार खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. सोबतच भाजपाकडे काहीजण येत आहेत, भविष्यातही येतील. जेवायला परवानगी काय घ्यावी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आदित्य ठाकरे गेले होते. त्यांनी परवानगी घेतली होती का? अशा परवानग्या घेत बसले तर एक माणूसही ठाकरे गटात राहणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी जरा दमाने घ्यावे, असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला. उद्धव ठाकरेंना दररोज धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिल्यानंतर त्यांनी पक्ष सावरणे अपेक्षित होते. मात्र, ते सध्या काँग्रेस आणि शरद पवार यांची तळी उचलत आहेत. कट्टर कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेऊ शकतात, अशी खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
दरम्यान, एकीकडे राज्यात पक्षाला लागलेली गळत थांबता थांबत नसताना आदित्य ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले. त्यांनी दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी खासदारांना सक्त सूचना दिल्या. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेमुळे शिवसेनेचे खासदार नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवे, असे सांगत ठाकरे गटाच्या संबंधित खासदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली, असे समजते.