“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:43 IST2025-08-12T13:42:46+5:302025-08-12T13:43:29+5:30

BJP Parinay Phuke News: मनोज जरांगे यांना मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून द्यायचे आहे की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे सांगत भाजपा नेत्यांनी टीका केली.

bjp parinay phuke said when elections come manoj jarange patil spoils the atmosphere and his remote key in sharad pawar hands | “निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?

“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?

BJP Parinay Phuke News: निवडणुका आल्या की मनोज जरांगे पाटील बाहेर पडतात. काहीतरी बेताल विधाने करून, आरोप-प्रत्यारोप करून स्वत:ला मीडियामध्ये चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मनोज जरांगे यांना मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून द्यायचे आहे की नाही, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. मराठ्यांना न्याय द्यायचा आहे की नाही. मराठा आणि ओबीसीसह इतर समाजात भांडणे लावण्याचे काम मनोज जरांगे पाटील करत आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रात अराजकता पसरवायचे काम मनोज जरांगे पाटील करत आहेत, अशी घणाघाती टीका भाजपा नेते परिणय फुके यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप अतिशय खालच्या दर्जाचे आणि किळसवाणे आहेत. कोणत्याही प्रकरचा कट कुणी करत नाही. मराठा आरक्षणासाठी सर्वांत जास्त प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाला. तो निर्णय हायकोर्टात टिकला. पण सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. मराठा समाजासाठी सारथी सारखी योजना आणून मराठा युवकांना कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार निर्मिती, उद्योजक बनवणे यासाठी हजार कोटी रुपये दरवर्षी सारथीला दिले जातात. गरीब समाजातील मराठा युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे परिणय फुके यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणातही भेदभाव करत नाहीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणातही भेदभाव करत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाती-पातीचे राजकारण कधीही केले नाही. जाती-पातीत भेदभाव केला नाही. पक्षातही कधी ते भेदभाव करत नाहीत. त्यांच्याकडे जो व्यक्ती येतो, त्यांना मदत करण्याचे, न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात, असे फुके यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे कायम महाराष्ट्रात अराजकता पसरवणे, भांडणे लावणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतात. यांचा बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला माहिती आहे. जनतेलाही ते माहिती आहे. निवडणुका आल्या की मनोज जरांगे पाटील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात, या शब्दांत फुके यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, १९९१ मध्ये मंडल आयोग लागू झाला. शरद पवार त्याआधीपासून राजकारणात आहेत. १९९१ पासून ते २०२५ पर्यंत त्यांना कधीही मंडल आयोग, ओबीसी कधीच आठवले नाही. एका विशिष्ट समाजासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्यभर राजकारण केले. ओबीसी मतदार त्यांच्याकडे आता राहिलेला नाही, त्यामुळे या प्रकारचा केविलवाणा प्रयत्न शरद पवार करत आहेत. ओबीसी समाजाला डावलून राजकारण करू शकत नाही, हे ३० ते ४० वर्षांनी शरद पवारांच्या लक्षात आले आहे. २०१४ पासून ते आतापर्यंत मराठा समाजाची जी आंदोलने झाली, त्यामागे काही ना काही कट कारस्थान करण्यासाठी शरद पवार होते. मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात आहे, असा दावा फुके यांनी केला. 

 

Web Title: bjp parinay phuke said when elections come manoj jarange patil spoils the atmosphere and his remote key in sharad pawar hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.