महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:26 IST2025-01-08T21:25:16+5:302025-01-08T21:26:17+5:30
भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले.

महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्यात प्रामुख्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार असं बोलले गेले. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना कॉल करून फोडण्यात येत असल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आमच्या पक्षातील खासदारांना फोन करत आहेत. बाप-लेकीला सोडून आमच्याकडे या असं सांगितले जात आहे. आमचे खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे मात्र आमच्या खासदारांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. प्रत्येकजण त्यांच्यासारखे कमरेचा लंगोट डोक्यावर घालून फिरत नाही. आमच्याकडे आजही नैतिकता आहे असं त्यांनी म्हटलं.
नितीश कुमारांना घाबरवण्याचा प्रयत्न
त्याशिवाय हे सगळे नितीश कुमार यांना एनडीएतच ठेवण्यासाठी केले जात आहे. शरद पवार येतायेत, उद्धव ठाकरे येतायेत अशा चर्चा केल्या जातात जेणेकरून नितीश कुमार एनडीएतच राहतील. आमच्या खासदारांना फोन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. तर जोपर्यंत शरद पवार गटाचे खासदार फोडणार नाही तोवर केंद्रात मंत्रिपद देणार नाही
असं भाजपाने अट ठेवली आहे. प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद हवे. शरद पवार गटाचे ६-७ आमदार फोडले तर पटेल मंत्री बनतील असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
'ऑपरेशन २७२' प्लॅनिंग?
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन २७२ ची चर्चा सुरू आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपाचं २४० खासदारांच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार बनले आहे. चंद्राबाबू नायडू १६ आणि नितीश कुमार यांचे १२ खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन २७२ चं प्लॅनिंग केले जात असल्याचं बोलले जाते. ज्यात शरद पवार गटाचे ८ आणि उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले. सर्व खासदार सोबत येतील किंवा एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.