कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 06:30 IST2025-09-27T06:30:04+5:302025-09-27T06:30:36+5:30
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा केला. शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्यांनी भेट घेतली.

कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
दादांचा ‘आदर्श’ स्वीकारला का?
उपमुख्यमंत्री अजित पवार बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कधी अधिकारी, कार्यकर्ते, नेते, इतकेच काय काही वेळा माध्यम प्रतिनिधीही त्यांच्या शब्दबाणांतून सुटले नाहीत. दोन दिवसांपूर्वी त्यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांना जाहीर बैठकीत खडसावल्याचा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनीही कृषी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ‘व्यवस्था सुधारा, ती तुमची जबाबदारी आहे, नाहीतर तुम्हाला मोठी अद्दल घडवीन,’ असे पटोले या व्हिडीओत म्हणतात. राजकीय नेत्यांनी दादांचा हा ‘आदर्श’ घेतला की काय?
देवाभाऊ, एवढं एक काम करा ना!
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे असे म्हणतात. जनतेसमोर सत्ताधारी- विरोधकांनी एकमेकांवर कडाडून टीका करायची. मात्र, एखादे काम साधून घ्यायचे असल्यास सौम्य भाषा, नव्हे भावनिक साद घालावी. असेही घडते. असाच एक किस्सा कामगार मेळाव्यात घडला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले. माथाडींना घरे मिळावीत यासाठी फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “देवाभाऊ संवेदनशील आहेत, हा प्रश्न तुमच्यासाठी किरकोळ आहे, आम्हाला फक्त निर्णय हवा आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या आवाहनाला कामगारांनीही दाद दिली नसेल तर नवल.
ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा केला. शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्यांनी भेट घेतली. वाटेत जिथे जिथे शेतकरी त्यांच्या ताफ्याला हात दाखवत तिथे ताफा थांबवून ते त्यांच्याशी चर्चा करत. मात्र, एके ठिकाणी त्यांची गाडी थांबली असता खा. संजय राऊत कारमध्येच बसले होते. त्यावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रदेश कार्यालयातून दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेले राऊत गाडीत बसून काजू-बदाम खात होते, असा आरोप केला. एकीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे, तर दुसरीकडे राजकीय चिखलफेक सुरू आहे. त्यामुळेच आरोप-प्रत्यारोपांच्या पुरात अजून बरेच काही वाहून जाणार असे दिसते.
माथाडी मेळाव्यात भाजपची छाप!
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, माथाडी कामगारांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच छाप नेहमीच दिसून येते. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार हे तर या कष्टकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय. परंतु, आता परिस्थिती बदलली असल्याचा प्रत्यय अण्णासाहेब पाटील यांच्या नवी मुंबईत झालेल्या जयंती सोहळ्यात आला. यावेळी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात मराठा आरक्षणावरच भर दिला. दुसरीकडे व्यासपीठावर भाजपचेच नेते अधिक होते. त्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपमय झाली, अशीच चर्चा होती. त्यामुळे याचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.