पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 19:12 IST2025-08-17T19:11:19+5:302025-08-17T19:12:06+5:30

मनोज जरांगे पाटील यांनी हट्टीपणा सोडला पाहिजे आणि EWS मधील आरक्षणासाठी मराठा तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

BJP MLA Parinay Phuke criticizes Manoj Jarange Patil over Maratha reservation | पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

गोंदिया - मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. त्यावरून भाजपा आमदार परिणय फुके यांनी जहरी टीका केली आहे. पावसाळ्यात बेडूक बाहेर पडतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात, त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं विधान त्यांनी केले आहे. 

गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना परिणय फुके यांनी मनोज जरांगेंवर टीका केली. फुके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मराठ्यांना जर खरेच आरक्षण हवे असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी EWS मध्ये आरक्षण दिले आहे. ते आरक्षण घेतले तर मराठा युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील, सरकारी नोकऱ्या मिळतील. सरकारच्या अनेक योजना मिळतील. मनोज जरांगे पाटील यांनी हट्टीपणा सोडला पाहिजे आणि EWS मधील आरक्षणासाठी मराठा तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

मुंबईत येण्याचा जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मराठ्यांची पोरं आता थांबणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचेही ऐकणार नाहीत, अशी मनःस्थिती समाजाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

सगळे मराठे मुंबईमध्ये येणार आहेत. यावेळी आपण ‘एक घर एक गाडी’ असा नारा दिला आहे.  यावेळी कोणीही घरी थांबू नये. ही अस्तित्वाची व अंतिम लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत समाज हरता कामा नये, मराठ्यांचे हसू होईल, असे एकही मराठ्याने आता वागू नये, राजकारण बाजूला ठेवूऊन मराठ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे ही मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

Web Title: BJP MLA Parinay Phuke criticizes Manoj Jarange Patil over Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.