'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:10 IST2025-09-30T20:01:29+5:302025-09-30T20:10:06+5:30
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली.

'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
Gopichand Padalkar on Jayant Patil: शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शरद पवार यांनी फोन करुन नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना समज दिली होती. मात्र त्यानंतरही गोपीचंद पडळकरजयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे.
जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळलं. मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केलं. जयंत पाटील यांच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र चोरलं हे त्यांनी सांगावे असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगलीतल्या आरेवाडी येथील कार्यक्रमात गोपीचंद पडळकर बोलत होते.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
"तुम्ही सगळे जण गोपीचंदला टार्गेट करत आहात. पण त्याचे कारण काय आहे? त्यांना माहिती आहे की मी लोकांना जागे करत आहे. हे सगळ्यात मोठं त्यांचे दुखणे आहे. माझ्यामुळे लोक त्यांना नमस्कार करायचे बंद करत आहेत. लोकांनी त्यांना घरी बोलवायला, जेवायला बंद केले आहे. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातील आहे. ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधात आहे. तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावांना माझा सवाल आहे की तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरलं ते लोकांना सांगा," असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
"बिरोबाचा आशीर्वाद असल्याने गोपीचंद पडळकर विरोधकांच्या छाताडावर नाचतो. याची मला फिकीर वाटत नाही. मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही. मी बोललो ती गोष्ट खरी आहे की, तुम्ही अमुकअमुक यांची औलाद आहे असं वाटत नाही. सांगलीमध्ये महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा घेण्यात आली, पण मला आई बहिणीवर शिव्या देत होते. मला ते गोप्या गोप्या म्हणाले. मला गोप्या म्हटलं तरी फरक पडत नाही. मग मी तुला जयंत्या म्हटलं तर चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हटलं तर चालेल का?" असाही सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.