मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ नाही- पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 17:06 IST2021-02-02T16:56:59+5:302021-02-02T17:06:11+5:30

पडळकर जातीचं राजकारण करत असल्याचा शिवसेनेचा आरोप

bjp mla gopichand padalkar criticised cm uddhav thackeray over unveiling of ahilyadevi holkar statue | मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ नाही- पडळकर

मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ नाही- पडळकर

ठळक मुद्देअहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून शिवसेना-भाजप आमनेसामनेएक वर्ष होऊनही मुख्यमंत्र्यांना पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ नाही- पडळकर१५ दिवसांत अनावरण करा, अन्यथा...; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हिंगोली: औंढा नागनाथमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आले आहेत. अहिल्यादेवींचा पुतळा गेल्या वर्षभरापासून अनावरणापासून वंचित आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वेळ नाही. हा अहिल्यादेवींच्या स्मृतींचा अपमान असल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तर पडळकर जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करत शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अ‍ॅडव्हाटेंज अजित पवार; निर्णय मोदी सरकारचा, पण फायदा ठाकरे सरकारला

अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणास होत असलेल्या विलंबाबद्दल गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. 'बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत मंदिर समितीद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पण हा पुतळा गेल्या वर्षभरापासून लोकार्पणापासून वंचित आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना पुतळा अनावरणाला वेळ मिळत नसल्यानं आजही अहिल्यादेवींचा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून दुर्लक्षितपणे उभा आहे. ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे,' असं पडळकर यांनी पत्रात लिहिलं आहे.



"उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पावर 30 मिनिटं बोललं पाहिजे"

'अहिल्यादेवी होळकरांचं कार्य राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. किरकोळ श्रेयवादासाठी लोकार्पण वर्षभर थांबवणं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतींचा अपमान केल्यासारखं आहे. येत्या पंधरा दिवसात या पुतळ्याचं अनावरण करावं. अन्यथा पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर श्रद्धा असणारे भक्त व समस्त समाज बांधवांच्या हस्ते भूषणसिंहराजे होळकर यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल,' असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

शिवसेनेचं पडळकर यांना प्रत्युत्तर
महान कर्तृत्ववान म्हणून ज्यांनी इतिहास गाजवला, त्या अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारून जनभावनेचा आदर राखला आहे. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावं, अशी सर्वांची इच्छा आहे. मध्यंतरी कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. मात्र त्यातही पडळकर यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेने त्यांच्यासारखे जातीचे राजकारण कधीही केली नाही. त्यामुळे पडळकर यांनीच आपल्या वागण्याचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली.
 

Web Title: bjp mla gopichand padalkar criticised cm uddhav thackeray over unveiling of ahilyadevi holkar statue