“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 09:53 IST2025-11-08T09:53:12+5:302025-11-08T09:53:47+5:30
BJP Minister Radhakrishna Vikhe Patil News: वस्तुस्थिती समोर आल्यानंतर बोलता येईल. विरोधकांना दुसरा मुद्दा नाही. त्यामुळे ते राजीनाम्याचा मुद्दा पुढे करत आहेत, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे.

“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
BJP Minister Radhakrishna Vikhe Patil News: पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचे सांगत हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आला आहे. तर, कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याच्यासह खडक पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातच आता भाजपा नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करत राजीनामा घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे कोविड काळात जनतेला गरज असताना घरात बसून राहिले. कोरोना लसीसाठी ठेवलेले सहा हजार कोटी रुपये गेले कुठे? शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे हे उद्धव ठाकरे यांचे बेगडी रूप आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कंपनीच्या नौटंकी सुरू आहे, अशी टीका भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही
पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांचा राजीनामा मागणे योग्य नाही. अजित पवारांनी त्याच वेळी ही प्रकरण थांबवले असते, तर इथपर्यंत वेळ आली नसती. मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी आदेश दिला आहे. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्यावर बोलता येईल. विरोधकांना दुसरा मुद्दा नाही. त्यामुळे ते राजीनाम्याचा मुद्दा पुढे करत आहेत, असे विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, जमीन खरेदी प्रकरणी चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर समिती गठीत झाली. महसूल, मुद्रांक, नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करुन एक महिन्यात अहवाल सादर करेल. समितीत एकूण ५ सदस्य आहेत.