“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:46 IST2025-12-05T19:43:46+5:302025-12-05T19:46:38+5:30
BJP Mangal Prabhat Lodha News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्य समजतात, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
BJP Mangal Prabhat Lodha News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सर्वांचे राजकीय गुरू झाले आहेत. भाजपा तर देवेंद्र फडणवीस यांचा आहेच, परंतु, राज्यातील अन्य पक्ष कसे चालतील, हेही देवाभाऊच ठरवतात. चित्रकार भरत सिंह यांनी यांनी देवेंद्र फडणवीस यांची सुमारे १०० वेगवेगळ्या प्रकारची चित्र रेखाटली आहेत. त्यांची विभिन्न रुपे आम्ही या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहत आहोत, या शब्दांत भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त भाजपाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक वर्षांच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. चित्रकार भरत सिंह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रवास चित्रांच्या माध्यमातून रेखाटला. त्यांच्या या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील वल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना भाजपा नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून जाहीर कौतुक केले.
पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला ते कुटुंबातील सदस्य समजतात
गेल्या २५ वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विधानसभेत बसत आहे. माझ्यापेक्षा अधिक ३० वर्षेही काही जण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असतील. देवेंद्र फडणवीस राजकीय नेते म्हणून कसे आहेत? हे सर्वांना माहिती आहेच. पण ते व्यक्ती म्हणून कसे आहेत, हे मी सांगतो. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला ते कुटुंबातील सदस्य समजतात. एरवी तुमच्या मेसेजला रिप्लाय मिळो या ना मिळो. पण तुमच्या घरात जर एखादी समस्या उद्भवली तर ते मदतीसाठी पुढे येतातच, असे मंगल प्रभात लोढा यांनी नमूद केले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस सामान्य परिस्थितीतून पुढे आले. राज्यातील एक प्रमुख नेता होण्याचा मान मिळवला. अभाविपमध्ये काम केल्यानंतर ते नागपूर मनपाचे सर्वांत कमी वयाचे महापौर बनले. २०१४ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा भाजपा राज्यभरात फार काही मजबूत स्थितीत नव्हती. पण आता अशी परिस्थिती आहे की, भाजपा तर पूर्ण देवाभाऊच्या पाठिशी आहेच. पण राज्यातील इतर पक्ष कसे चालणार हे देवाभाऊ ठरवत आहेत, असे लोढा यांनी म्हटले आहे.