bjp leader udayanraje bhosale praises cm devendra fadnavis slams congress ncp | साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे

साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे

सातारा: विरोधी पक्षाचा खासदार असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम मला मदत केली. अनेक प्रकल्प मार्गी लावले. फडणवीसांना जे जमलं, ते साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केलं. भाजपा प्रवेशानंतर उदयनराजे यांनी पहिल्यांदाच साताऱ्यात भाषण केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करत काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. 

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात आली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी भाषण केलं. उदयनराजे यांनी त्यांच्या भाषणातून काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 'मी तुकड्यावर जगतो, असं कोणी म्हणू नये. उलट असं म्हणणाऱ्यांनी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था तुकड्यातुकड्यासारखी का झाली आहे, याचा विचार करावा. पक्षाच्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करण्याची वेळ आली नसती,' असा टोला उदयनराजेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीला लगावला. 

आधी सत्तेत असतानादेखील जनतेची कामं व्हायची नाहीत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मी राष्ट्रवादीचा खासदार असतानाही अनेक प्रकल्प मार्गी लावले. आधी सत्ता असूनही जनतेच्या कामांसाठी भांडावं लागायचं. मला साताऱ्यात आयआयएम, आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्था आणायच्या होत्या. मात्र त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी राज्यात जागा नसल्याचं कारण दिलं, अशा शब्दांमध्ये उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो, तेव्हा माझं मताधिक्य वाढलं होतं. मात्र यंदा माझं मताधिक्य कमी झालं. याबद्दलचा विचार करुन मी आत्मचिंतन केलं आणि त्यानंतर काम करणाऱ्या सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं उदयनराजे म्हणाले. आधीची माणसं कामाला लावणारी होती. मात्र आता मंचावर असलेली माणसं कामं मार्गी लावणारी आहेत. त्यामुळे आता लोकांनीदेखील कामाला लावणारी आणि कामं मार्गी लावणारी माणसं ओळखावी, असं आवाहन त्यांनी केलं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader udayanraje bhosale praises cm devendra fadnavis slams congress ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.