"पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही"; नारायण राणे
By देवेश फडके | Updated: January 18, 2021 16:18 IST2021-01-18T16:14:50+5:302021-01-18T16:18:03+5:30
महाराष्ट्रातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागत असताना नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांचा गड मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे.

"पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही"; नारायण राणे
सिंधुदुर्ग : मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती. कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होते, असे विधान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागत असताना नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मी पक्षात असल्यामुळेच कोकणात शिवसेनेची ताकद होती. कोकण आणि शिवसेनेचे समीकरण केवळ माझ्यामुळे जुळून आले होते. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिलेला नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सर्व आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही चांगली मुसंडी मारली आहे. आता पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी बोलताना केला.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. नारायण राणे यांचा गड मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपचा झेंडा फडकला असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. तळकोकणातील शिवसेनेच्या वर्चस्वाला हा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, राणे कुटुंबाला धक्का देणारा अजून कोणीही जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. जनता आमच्याबरोबर आहे, असा दावा आमदार नीतेश राणे यांनी केला. तर, विधानसभेचा राग मनात ठेवून सावंतवाडीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला योग्य ती जागा दाखवली आहे. ही पुढच्या विजयाची नांदी आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखण्यात भाजपला यश आले आहे. देवगड तालुक्यात भाजपाने १७ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. वैभववाडी तालुक्यात भाजपकडे ९ आणि शिवसेनेकडे ४ ग्रामपंचायती आल्या आहेत. मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला असून, ५ ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे.