Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 16:16 IST2023-02-19T16:16:14+5:302023-02-19T16:16:56+5:30
Maharashtra News: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केला, हिंदुत्व सोडले. म्हणून नाव ही गेले आणि निशाण ही गेले, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा”
Maharashtra Politics: शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गट आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपावरून भाजपने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा
शिवसेना नाव आणि निशाणीसाठी रुपये २००० कोटींचा सौदा झाला” असे संजय राऊत म्हणतात, मला आशा आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोर्टात याचीका करणार आहे, त्यात हा आरोप, माहितीचा उल्लेख करणार, असे ट्विट किरीट सोमय्यांनी केले आहे. तसेच या ट्विटसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये, संजय राऊत म्हणतात शिवसेना नाव आणि निशाणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाला. उद्धव ठाकरे आपण आणि संजय राऊत जे कोर्टात अपील करणार आहात, त्यात हा आरोप आपण करणार ना? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी विश्वासघात केला, हिंदुत्व सोडले. म्हणून नाव ही गेले आणि निशाण ही गेले. आता दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन निघाले आहेत तर नामोनिशाण तरी उरणार का? असा खोचक सवाल किरीट सोमय्यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"