bjp leader chitra wagh demands mumbai police should take action against renu sharma dhananjay munde rape allegation | खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी; चित्रा वाघ यांची मागणी

खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी; चित्रा वाघ यांची मागणी

ठळक मुद्देरेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणामुळे तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना सांगितलंचित्रा वाघ यांच्याकडून रेणू शर्मांवर कारवाई करण्याची मागणी

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठं वादंग निर्माण झालं होतं. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी राज्यभर भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलनही करण्यात आलं होतं. परंतु आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया देत तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

"रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंवर बलात्कारासारखा गंभीर आरोप केला होता. परंतु आता त्यांनी तो मागे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडेंवर ज्यावेळी बलात्काराचा आरोप झाला हे आमच्यासाठीही तितकंच धक्कादायक होतं. आज ज्या पद्धतीनं तक्रार मागे घेतली गेली हेदेखील तितकंच धक्कादायक आहे," असं चित्रा वाघ म्हणाल्या. पहिल्या दिवसापासून भाजपची भूमिका होती ती स्पष्ट होती. आमच्यासाठी हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नव्हतं. आम्ही चुकीचं उदाहरण महाराष्ट्रापुढे जाऊ देणार नाही ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामाही मागितला होता, असंही त्या म्हणाल्या."ज्या प्रकारे रेणू शर्मा यांनी हा आरोप मागे घेतला त्यामुळे त्यांच्यावर आयपीचीच्या १९२ अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. खोटे आरोप करणं आणि गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. राजकीय कार्यकर्ता असो किंवा सामान्य व्यक्तीही असो तो उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये खऱ्या पीडिता आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. हे समाजाच्या हिताचं नाही. खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मांवर आयपीसीच्या १९२ अंतर्गत तात्काळ कारवाई करावी. अशी विनंती पोलिसांकडे करत आहे. तपासकार्य सुरू असताना हा गुन्हा मागे घेतला आहे त्यामुळे खोटे आरोप केल्याबद्दलच्या कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी," असं चित्रा वाघ म्हणाल्या.

तक्रार मागे

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनीदेखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.

काय केले होते आरोप? 

'२००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वना दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला, असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिलेनं केले, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप महिलेने केला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader chitra wagh demands mumbai police should take action against renu sharma dhananjay munde rape allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.