'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:25 IST2024-12-18T15:19:45+5:302024-12-18T15:25:09+5:30
काल संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला हे. आज संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाजपासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले
"संसदेत संविधानावरील चर्चेवेळी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख तुच्छतेने आणि उर्मटपणे केला, शाह यांच्यात असे बोलण्याची हिंमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने सांगितल्याशिवाय संसदेत अशाप्रकारचे वक्तव्य शाह यांनी शक्य नाही, यामुळे आता भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून भाजपाचे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. तो अपमान आता सहनशीलतेच्या पलिकडे गेला आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. आम्ही त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. पण भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली नाही, मधल्या काळात घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवतानासुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला. तो पुतळा आठ महिन्यात पडला. त्यानंतर काय घडलं आपल्या सर्वांना कल्पना आहे. महाराष्ट्र हा जणू गांडूळांचा प्रदेश आहे असं भाजपाच्या वरिष्ठांना वाटू लागले आहे. उद्योगसुद्धा ते गुजराला घेऊन जात आहे, आता काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ज्या प्रकाराने उल्लेख केला, मला आता असं वाटत आता भाजपाचा बुरखा फाटला आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांच्या या वक्तव्यात उद्दामपणा होता. आमच्याशिवाय कोणी या देशात जन्माला आलाच नव्हता, असं चित्र भविष्यात यांना निर्माण करायचे आहे. भाजपवाले आता नेहरुंवरुन आंबेडकरांवर आले आहेत. आता अशावेळी भाजपाला पाठिंबा देणारे रामदास आठवले, शिंदे गट आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. शिंदे आणि अजित पवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत खुलासा केला पाहिजे. एरवी अदानींचे नाव घेतल्यावर भाजपाचे सगळे नेते तुटून पडतात. महाराष्ट्र आणि देशाने आतातरी शहाणे झाले पाहिजे. त्यांना संविधान बदलायचे आहे, हे आम्ही सांगत होतो. भाजपला महाराष्ट्रात राक्षसी बहुमत मिळालं आहे. आता महाराष्ट्राला कसंही झोडा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करा, अशी मस्ती भाजपला चढली आहे. ही मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.